ना भोंगा, ना बॅनर, ना जेवणावळी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 03:10 AM2021-01-14T03:10:48+5:302021-01-14T03:11:23+5:30

हिवरेबाजारमध्ये ३५ वर्षांनंतर निवडणूक; साध्या पद्धतीने प्रचार

No horns, no banners, no meals for election | ना भोंगा, ना बॅनर, ना जेवणावळी

ना भोंगा, ना बॅनर, ना जेवणावळी

Next

साहेबराव नरसाळे

अहमदनगर : बिनविरोध गावांमध्ये निवडणूक लागताच यावर्षी नुस्ता धिंगाणा उभा राहिला. मात्र, याला अपवाद ठरले ते हिवरेबाजार! हिवरेबाजारमध्ये ३५ वर्षांनंतर निवडणूक लागली. मात्र, गावात ना भोंगा वाजला, ना बॅनर लागले, ना जेवणावळी उठल्या. उमेदवारांनी साध्या पद्धतीने प्रचार करीत विकासाच्या मुद्यावर मत मागितले.

हिवरे बाजार (ता. अहमदनगर) हे राज्याच्या आदर्श गाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे गाव. या गावात १९८५ नंतर प्रथमच निवडणूक लागली. हिवरेबाजारचे माजी सरपंच उत्तमराव संबळे यांचे चिरंजीव प्रा. किशोर संबळे यांनी पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनेल उभे केले. पॅनेलच्या प्रचारासाठी त्यांनी सर्व परवानगी घेतल्या. घरोघर जाऊन प्रचार केला. गावातून रॅली काढून संबळे यांनी प्रचाराची सांगताही केली. 

निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा भाग आहे. यावर्षी गावात निवडणूक लागली. पण ही निवडणूकही आम्ही आदर्श पद्धतीनेच करण्याचा चंग बांधला होता. आम्ही घरोघर जाऊन विकासाच्या मुद्यावर मत मागितले. कुठेही बोर्ड लावला नाही. प्रचाराची गाडी फिरविली नाही. कुणावरही आरोप केले नाहीत. त्यापासून आम्ही सर्वजण अलिप्त राहिलो.
    - पोपटराव पवार,     माजी सरपंच, हिवरेबाजार

आम्ही घरोघर फिरून प्रचार केला. गावातून रॅली काढून प्रचाराची समाप्ती केली. माझे वडील सरपंच होते. म्हणून मीही निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. त्यासाठी सर्व सात जागांवर उमेदवार दिले आहेत. प्रचारात आम्ही कुणावरही आरोप केलेले नाहीत. फक्त आमची भूमिका मतदारांसमोर मांडली.
    - प्रा. किशोर संबळे, हिवरेबाजार

Web Title: No horns, no banners, no meals for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.