मंत्रालयात घरची भाकरी खाणारे कॉ. बाळासाहेब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 04:40 PM2019-08-16T16:40:32+5:302019-08-16T16:40:49+5:30

आमदार हा लोकांचे प्रश्न सोेडविण्यासाठी असतो़ सरकारचा पैसा स्वत:वर खर्च करण्यासाठी नाही, अशा परखड मताच्या कॉम्रेड बाळासाहेब नागवडे यांनी कधीही स्वत:च्या प्रवासावर, स्वत:च्या सुविधांसाठी सरकारी पैसा वापरला नाही़ आमदार असताना विधानसभेत जातानाही ते घरातून भाकर, दशम्या बांधून न्यायचे. घरातून नेलेल्या भाकरीच ते खायचे. प्रवासासाठीही त्यांनी कधी कारचा आग्रह धरला नाही. एस.टी. बसनेच ते मुंबईला विधानसभेत जायचे. तेथे नगर तालुक्याच्या प्रश्नांवर पोटतिडकीने बोलायचे.

Ministry, Home, Bread, Eating, Balasaheb | मंत्रालयात घरची भाकरी खाणारे कॉ. बाळासाहेब 

मंत्रालयात घरची भाकरी खाणारे कॉ. बाळासाहेब 

Next

अहमदनगर : आमदारकीला वलय नसतानाच्या काळात घरच्या भाकरी खाऊन दुष्काळी नगर तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे, सहकार, शेती व सिंचन योजनांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे आमदार म्हणून कॉ. बाळासाहेब नागवडे प्रसिद्ध होते. २५० रुपये मानधन व ११ रुपये उपस्थिती भत्ता मिळत असतानाच्या काळात म्हणजे १९६२ ते ६७ या काळात बाळासाहेब नागवडे नगर तालुक्याचे आमदार होते. ज्येष्ठ नेते वसंतराव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री होते. नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या व मराठवाड्यातील जायकवाडी धरणांच्या रखडलेल्या कामांना कॉ. नागवडे यांनी वाचा फोडली. ही दोन्ही धरणे नगर जिल्हा व औरंगाबादसह मराठवाड्याची जीवनदायी ठरणार असल्याने त्यांची कामे लवकरात लवकर होण्यासाठी बाळासाहेबांनी संघर्ष केला.
नगर तालुक्यातील गुणवडी या लहान खेडेगावातील बाळासाहेब नागवडे यांचे शालेय शिक्षण फारसे नव्हते. त्यांचे आजोबा शंकरराव नागवडे यांनी त्यांना शिक्षणासाठी आजोळी ठेवले होते. पण चांगला मित्र परिवार नसल्याने पुन्हा बाळासाहेब गुणवडीत आले. जेमतेम चौथीपर्यंत शिकल्यानंतर पुढील शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. एकुलत्या एक नातवाने खूप शिकावे, असे आजोबांना वाटत़ पण तसे झाले नाही. शिक्षणाला रामराम ठोकल्यानंतर गावातील काँग्रेसचे नेते अण्णासाहेब कुटे यांच्यासोबत ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. सन १९३६ ते १९४० पर्यंतच्या काळात वृत्तपत्र वाचनातून तसेच प्रभातफे-या व अन्य उपक्रमातून त्यांच्यातील कार्यकर्ता घडत गेला. 
ब्रिटिश काळातील तालुका विकास मंडळाच्या उपाध्यक्षपदाची धुरा १९४५ ते ५३ या काळात त्यांनी सांभाळली. १९४८ मध्ये ते बॉम्बे प्रोव्हीन्शियल बँकेवर संचालक म्हणून निवडून आले. या काळात ते काँग्रेससोबत होते़ पुढे १९५० मध्ये उदयाला आलेल्या शेतकरी कामगार पक्षामध्ये ते बापूसाहेब भापकर, दत्ता देशमुख यांच्यासोबत काम करू लागले. वाचनाची आवड असल्याने प्रभाकर संझगिरी लिखित ‘मानवाची कहाणी’ या पुस्तकाचे त्यांनी वाचन केले. या वाचनानंतर कम्युनिस्ट विचारसरणीकडे त्यांचा कल वाढत गेला. बाळासाहेबांनी १९५३ मध्ये वाळकी गटातून जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक लढवली. १९५३ व १९६२ असे दोन वेळा ते लोकल बोर्डवर कार्यरत होते. याच काळात १९५७ मध्ये लोकल बोर्डाचे अध्यक्षपद कम्युनिस्ट व लाल निशाण पक्षातील मतभेदामुळे हुकले. याच काळात राज्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोमात सुरु झाली होती. १९५७ मध्येच विधानसभेच्या निवडणुका लागल्या. तालुक्यातून लाल निशाण पक्षातर्फे बापूसाहेब भापकर उभे होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून अण्णासाहेब कुटे उभे राहिले. बाळासाहेब व त्यांच्या सहकाºयांनी नगर व नेवासा तालुका पिंजून काढत भापकरांना विजयी केले. पुढे १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत लाल निशाण पक्षाने बाळासाहेब नागवडे यांना संधी दिली. मात्र त्यांच्या विरोधात त्यांच्याच गुणवडी गावचे व तालुक्याचे काँग्रेसचे नेते अण्णासाहेब कुटे होते. नागवडे यांच्या कमी शिक्षणाचा विरोधकांनी खूप प्रचार केला. पण विद्यार्थी, शेतकरी, कामगार व सामान्य यांच्यासाठी काम केलेल्या विविध लढ्यामुळे नागवडे लोकप्रिय झाले होते. त्यांच्या संघर्षशील स्वभावावर मतदार प्रभावित झाले होते़ यामुळे या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. बाळासाहेब नागवडे आमदार झाले.
बाळासाहेबांची आमदारकी आगळीवेगळी होती. घरून दशम्या घेऊन एस.टी. बसने ते मुंबईला जायचे. त्यावेळी आमदारांना फारसे अधिकार नव्हते. आजच्या काळात असणारा आमदारांचा रुबाब, ऐट त्यावेळी नव्हती. जास्त निधीही मिळत नव्हता. अनेकदा पदरमोड करुन लोकसेवा त्यांनी केली. त्यांच्या कार्यात त्यांची पत्नी छबूबाई यांची त्यांना मोलाची साथ लाभली. आपली आमदारकी त्यांनी सामान्य लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्यात व ते सोडवण्यात घातली.
१९६७ च्या निवडणुकीत नागवडे यांना पाडण्यासाठी सर्व काँग्रेस नेते एकत्र आले. हक्काची मते विभागली गेल्याने त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांना एक करुन काँगे्रेसविरोधात दंड थोपटले़ पण आर्थिक ताकद कमी पडल्याने त्यांना फारसे यश मिळत नाही. कम्युनिस्ट चळवळीची कालांतराने पीछेहाट होत गेली़ १९६५ मध्ये अन्नधान्य कृती समितीच्या आंदोलनात, १९६८ मध्ये धरणग्रस्तांच्या आंदोलनात, १९७८ मध्ये भूमीमुक्ती आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यात त्यांना कारावासही भोगावा लागला. कोपरगावचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या ऐतिहासिक १९७२ च्या रुम्हणे मोर्चात नागवडे सक्रिय होते.
नगर दक्षिणमधून नागवडे यांनी १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली़ पण त्या काळात आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांच्या जनता पक्षाची मोठी लाट होती. अण्णासाहेब शिंदे व मोहनराव गाडे यांच्या विरोधात नागवडे उभे होते़ पण या लाटेत त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत त्यांनी घेतलेली ३९ हजारावरील मते त्यांच्या लोकप्रियतेची पावती होती. यानंतर नागवडे यांनी निवडणूक लढवण्याचा विषय डोक्यातून काढून टाकला. ते नंतर समाजकार्याकडे वळले. अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा त्यानंतर मोठ्या स्वरूपात पुढे आली. जिल्हा बँकेच्या वार्षिक सभा त्यांनी गाजवल्या. 
नगर तालुक्यात साखर कारखाना उभा राहवा म्हणून त्यांनी माजी आमदार कि. बा. म्हस्के यांच्या सोबत प्रयत्न सुरु केले. पण त्यात अनेक अडचणी उभ्या राहिल्या. नगर तालुक्यात पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्याची मोठी समस्या या निमित्ताने पुढे आली. त्यानंतर साखर कारखाना हा विषय थोडा बाजूला ठेऊन कुकडीचे पाणी नगर तालुक्याला मिळावे, अशी मागणी पुढे आली. ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांच्या कारखाना उभारणीच्या कामाला नागवडे यांनी साथ दिली. कारखाना उभा राहिला़ पण पाण्याचा प्रश्न सुटलेला नव्हता. 
ब्रिटिश काळात नगर तालुका विकास मंडळाच्या माध्यमातून ऐन तारुण्यात शेतकरी हितासाठी १९४५ पासून सक्रिय झालेल्या बाळासाहेबांनी त्यावेळच्या बॉम्बे प्रोव्हीन्शीयल बँक (सध्याच्या राज्य सहकारी बँक) व दोन वेळा जिल्हा लोकल बोर्डाचे (सध्याची जिल्हा परिषद) सदस्यत्व, जिल्हा सहकारी मंडळ, नगर तालुका खरेदी विक्री संघ, दुष्काळ निवारण समिती यासह अनेक पदांवर काम केले. सामान्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. नगर तालुक्याचा पाणी प्रश्न सुटावा, यासाठी ते आयुष्यभर प्रशासनाशी, शासनाची संघर्ष करीत राहिले. कुकडीचे पाणी सोलापूरला जाते. पण नगर तालुक्याला मिळत नाही, अशी त्यांची खंत कायम राहिली.

परिचय
जन्म : १९२३
गाव : गुणवडी (ता़ नगर)
शिक्षण : चौथी

- १९३६ ते १९४० : स्वातंत्र्य चळवळीत सहभाग
- १९६२ ते १९६७ : विधानसभा सदस्य
- १९७७ : लोकसभा निवडणूक पराभव
- २ आॅगस्ट २०१६ : देहावसान
भूषविलेली पदे 
- बॉम्बे प्रोव्हीन्शीयल बँक- संचालक
- जिल्हा लोकल बोर्ड - सदस्य
- नगर तालुका खरेदी विक्री संघ- संचालक
- दुष्काळ निवारण समिती - सदस्य


लेखक - योगेश गुंड (‘लोकमत’ नगर तालुका प्रतिनिधी)

Web Title: Ministry, Home, Bread, Eating, Balasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.