शेवगाव तालुक्यात कोरोना काळातही पशुधनाचे लसीकरण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:22 AM2021-05-18T04:22:54+5:302021-05-18T04:22:54+5:30

शेवगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र पशुवैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने तालुक्यात कोरोना ...

Livestock vaccination continues in Corona period in Shevgaon taluka | शेवगाव तालुक्यात कोरोना काळातही पशुधनाचे लसीकरण सुरूच

शेवगाव तालुक्यात कोरोना काळातही पशुधनाचे लसीकरण सुरूच

googlenewsNext

शेवगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र पशुवैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने तालुक्यात कोरोना काळातही पशुधनाच्या वैद्यकीय उपचारासोबतच लसीकरणाची मोहीम नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.

तालुक्यात जवळपास २०१२ सालच्या गणनेनुसार १ लाख ६४ हजार १९५ इतकी पशुधनाची संख्या आहे. यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, बैल, घोडे आदींचा समावेश आहे. पशुधनासाठी आवश्यक असलेल्या एफएमडी, घटसर्प, फऱ्या, लाळ्याखुरकत आदी लसीकरणाची मोहीम नियमितपणे राबविली जात आहे. तसेच ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा नियमितपणे पुरवल्या जात आहेत. शेवगाव, बोधेगाव, ढोरजळगाव, जोहरापूर, दहिगावने, शहरटाकळी, सामनगाव, घोटण, भातकुडगाव, अमरापूर, आखेगाव, दहिफळ, चापडगाव, लाडजळगाव, बालमटाकळी, मुंगी, आदी भागात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात सेवा दिली जात आहे. दरम्यान काही ठिकाणी घरपोच पशुवैद्यकीय सेवा पुरवली जात असल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी सी. आर. असलकर यांनी सांगितले.

-------

तालुक्यातील जनावरांची एकूण आकडेवारी.

शेळ्या- ५१,४२६, मेंढ्या-१०,६७३, गाय- ८१,७०२, म्हशी- २०,१४०, घोडे, खेचर- १२६, डुकरे- ९९६.

---

तालुक्यात नियमितपणे लसीकरण मोहीम राबवली जाते. गावोगावी विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. पावसाळ्यातील लसीकरण लवकरच पूर्ण केले जाईल. सध्या अहमदनगर येथे लस आल्या आहेत. त्या लवकरच आणून पावसाळ्यातील लसीकरण मोहीम राबवली जाईल.

सी. एस. असलकर,

पशुवैद्यकीय अधिकारी, शेवगाव

-------

या लसी दिल्या जातात.

वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पशुधनासाठी लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या लक्षात घेऊन लसीकरण मोहीम राबवली जाते. एफएमडी, घटसर्प, फऱ्या, लाळखुरकत अत्रविशर आदी लसीकरण करण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी आवश्यक असणाऱ्या लस पुढील काही दिवसात पशुवैद्यकीय विभागाला प्राप्त होतील. त्यानंतर लसीकरण होणार आहे.

-----

कोरोना काळातही बजावली सेवा

कोरोनाच्या संकट काळात पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेला खंड पडू दिला नाही. फ्रंटलाइन वर्कर म्हणून पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आलेले आहे. मात्र खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे अद्याप लसीकरण झाले नाही. पशुसेवेसाठी बाहेर काम करावे लागत असल्याने घरी कोरोना प्रादुर्भावाचा धोका आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण करण्याची मागणी होत आहे.

---

आमच्या गावात नियमितपणे पशुवैद्यकीय सेवा मिळतात. पशुवैद्यकीय डॉक्टरांना फोन केल्यास ते तत्काळ उपलब्ध होतात.

-विष्णू मुटकुळे,

शेतकरी.

--

पशुधनाची लसीकरण मोहीम राबवली जात आहे. कोरोनामुळे पशुधनाचे लसीकरण लांबणीवर पडते की काय अशी शक्यता होती. मात्र पशुवैद्यकीय सेवा अत्यावश्यक असल्याने लसीकरण करण्यात आले आहे.

-नितीन काकडे,

शेतकरी, बोधेगाव

Web Title: Livestock vaccination continues in Corona period in Shevgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.