कोयता हाच देव... उसाचे थळ हेच मंदिर; ऊस तोडणी मजुरांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:00 PM2020-01-03T12:00:56+5:302020-01-03T12:03:06+5:30

लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले.

Kovita is the god ... the place of sugarcane is the temple; Feelings of laborers harvesting sugarcane | कोयता हाच देव... उसाचे थळ हेच मंदिर; ऊस तोडणी मजुरांची भावना

कोयता हाच देव... उसाचे थळ हेच मंदिर; ऊस तोडणी मजुरांची भावना

Next

अनिल साठे । 
शेवगाव : गावाकडे सततचा दुष्काळ पाठीला पूजलेला, पाण्याअभावी रानं पडीक पडले आहेत, हाताला काम नाही. लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले.
‘लोकमत’ प्रतिनिधीने गंगामाई (ता. शेवगाव) साखर कारखान्याच्या एका सात कोयत्याच्या टोळीत ऊस तोडणी मजुरांच्या सानिध्यात दोन दिवस राहुन त्यांचे काम अनुभवले. मजूर हे चिंचपूर (ता. पाथर्डी) येथील होते. त्यांच्यासोबत काम करून त्यांच्या व्यथा, अडचणी जाणून घेतल्या. वीज, पाणी, स्वच्छता गृह, किराणा, पंक्चर दुकान, हॉटेल, कटाई, पिठाची गिरणी आदी सुविधा कारखाना परिसरात होत्या. मात्र आरोग्य, प्राथमिक उपचार, जनावरांचा डॉक्टर, साखर शाळा आदी सुविधांचा अभाव दिसला. वाहनांची रहदारी असलेल्या रस्त्यावर पुरेशी वीज व्यवस्था होती. मात्र कामगारांच्या कोप्या भोवताली अंधारच होता.
ऊस तोडणी मजुरांचा दिवस मध्य प्रहरी एकच्या सुमारास होतो. महिला उठून न्याहारीसाठी सायंकाळी केलेली भाकरी, भाजी कापडी फडक्यात बांधून घेतात. सोबत पिण्यासाठी पाणी दुधाच्या कॅनमधे घेतले जाते  अन् सुरू होतो उसाच्या फडाकडे प्रवास. मुकादम विष्णू दशरथ बडे यांच्यासह टोळीतील त्यांचे सहकारी बुवासाहेब बडे, अशोक त्रिंबक बडे, गणेश आजीनाथ बडे, संजय होडशीळ, शाहीराम महादेव बडे, मारुती अर्जुन कावळे हे पत्नीसह कारखान्यापासून रात्री १ वाजून ३६ मिनिटांनी घोटण, खुंटेफळमार्गे दादेगावकडे बैलगाड्यांचा ताफा घेऊन निघाले. पहाटे ४ वाजता उसाच्या फडावर पोहोचले. तेथे बैलांना वाढे टाकून सर्वांनी कोयत्याने सापसप ऊस तोडायला सुरवात केली. प्रत्येक जोडप्याने सºया वाटून घेतल्या होत्या. सकाळी सूर्य उगवल्यावर सातच्या सुमारास ऊस तोडायचे थांबवले. महिलांनी उसापासून वेगळे केलेले वाढे गोळा करत पेंढ्या बांधण्यास सुरवात केली. पुरुषांनी ऊस बांधत बैल गाडीत टाकण्यास सुरवात केली. मध्ये पाच मिनिटाचा ब्रेक घेत सोबत आणलेले बिस्किट पाण्याबरोबर खाल्ले व पुन्हा काम सुरू केले. पुरुष मंडळींइतकीच मेहनत महिलाही घेत होत्या.
दहाच्या सुमारास गाडीत भरलेला ऊस दोरीच्या सहाय्याने बांधत बैलांना जुंपले. पुन्हा कारखान्याकडे परतीचा प्रवास सुरू झाला. प्रवासात न्याहारी करत दुपारी साडेबाराच्या सुमारास कारखान्याच्या वजन काट्यावर गाड्या पोहोचल्या. 
जवळपास सगळ्यांनी दोन टन ऊस गव्हाणीत टाकला होता. ९०० ते १००० रूपयांची कमाई झाली होती. ती कमाई दोघांची नव्हती तर चौघांची होती. दोन टनापेक्षा जास्त ओझे बैलांच्या मानगुटीवर होते. त्यांचीही मेहनत त्यात होती. बारा तासात प्रत्येकाने २०० ते २५० रूपये कमावले होते. कोपीमध्ये परतल्यावर बैलाच्या पाठीवर थाप टाकून प्रत्येकाने त्यांना पेंड खायला दिली.
बैलगाडीचे कार्यक्षेत्र १७ किलोमीटरचे...
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १७ किमीपर्यंतच ऊस टायर बैल गाडीला आणता येतो. ऊस तोडणे आणि भरणे यासाठी १२ किलोमीटरला प्रतिटन ४४०.४ रूपये मिळतात. वाढीव प्रत्येक किलोमीटर मागे १२ रूपये जास्त मिळतात. ट्रॅक्टर, जिटी, ट्रक वरील टोळ्यांना वेगळा दर मिळतो. ऊस तोडणे व भरणे यासाठी ट्रॅक्टर टोळीला प्रतिटन २६७ रूपये मिळतात. ऊस खाली करण्यासाठी प्रत्येकाच्या वेगळ्या रांगा व नंबर दिला जातो.
कोणत्याच योजनेबद्दल माहिती नाही
ऊस तोडणी मजुरांच्या योजनांबद्दल किंचितही कल्पना त्यांना नव्हती. केवळ ऊस तोडायचा, किती वजन भरले अन् किती रूपये मिळाले इतकेच त्यांच्या रोजच्या जगण्यातील गणित आहे. कष्ट करतांना मोलाची साथ देणाºया बैलाच्या जोडीची प्रचंड काळजी त्यांच्यात दिसली.
घेतलेली उचल फे डायची कशी?
बहुतांश मजूर जोडप्यांनी मुलांना घरी आई, वडिलांच्या जवळ ठेवलेले होते. काहींनी वसतिगृहामध्ये ठेवले होते. उसाच्या कमतरतेमुळे गळीत हंगाम यंदा लवकर उरकणार याची चिंता सतावत होती. मुकादमाकडून घेतलेली उचल फेडायची तरी कशी अन् पट्टा पडल्यावर घरी जाऊन करायचे तरी काय? महिनाभरानंतर दुसरे काम शोधावे लागणार या काळजीत मजूर दिसत होते. 
लोकमत प्रतिनिधी २७ तास उसाच्या थळात
‘लोकमत’ प्रतिनिधी अनिल साठे हे गंगामाई (ता. शेवगाव) साखर कारखान्याच्या एका सात कोयत्याच्या टोळीत ऊस तोडणी मजुरांच्या सानिध्यात तब्बल २७ तास राहिले. त्यांच्यासोबत राहुन मजुरांचे काम अनुभवले. चिंचपूर (ता. पाथर्डी) येथील मजूर त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबत काम करून, त्यांच्यासोबत भाजी-भाकरी खात त्यांच्या व्यथा, अडचणी जाणून घेतल्या. अंधार, रात्रीची थंडी मजुरांसोबत अनुभवत त्यांचे जीवन किती खडतर आहे, प्रत्यक्ष अनुभवले. त्यांच्या या आपुलकीचे मजुरांनीही कौतुक केले.

Web Title: Kovita is the god ... the place of sugarcane is the temple; Feelings of laborers harvesting sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.