Kadgaon reinstates MLAs, Jagatap gets 8,000 lead | आमदारकी बहाल करणा-या केडगावमधूनच जगतापांना धक्का : विखेंना तब्बल ८ हजारांचे लीड
आमदारकी बहाल करणा-या केडगावमधूनच जगतापांना धक्का : विखेंना तब्बल ८ हजारांचे लीड

योगेश गुंड
केडगाव :केडगाव उपनगराला गृहीत धरून आपले राजकीय आडाखे बांधणा-या प्रस्थापित राजकीय नेत्यांना केडगाव पॅटर्नने या निवडणुकीत जोरदार दणका दिला. ज्या केडगावने संग्राम जगताप यांच्या आमदारकी बहाल केली त्याच केडगावकरांनी डॉ. सुजय विखे यांना ८ हजारांचे लीड देत अनेकांची राजकीय गणिते चुकवली.
केडगावची काँग्रेस विखे गटाला मानणारी असल्याने सुरूवातीपासुनच भाजपचे सुजय विखे यांनी केडगावमध्ये आपले राजकीय बस्तान पक्के केले. आरोग्य शिबीरे व हळदीकुंकू यासारख्या कार्यक्रमामुळे त्यांनी केडगावकरांवर आपला प्रभाव पाडला. मनपा निवडणुकीतही त्यांनी केडगावमध्ये जास्त लक्ष घालुन येथील राजकारण बारकाईने समजुन घेतले. कोतकर काँग्रेसचा भाजप पॅटर्न फेल गेल्याने कोतकर यांचे भाजपमध्ये गेलेले समर्थक पुन्हा लोकसभा निवडणुकीसाठी विखे यांच्या मांडवात आले. मात्र राष्ट्रवादीने ऐनवेळी आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी बहाल केल्याने या समर्थकांची कोंडी झाली. अनेकांनी भुमिगत राहुन विखे यांचा प्रचार करून दिलेला शब्द पाळला तर काहींनी जगताप यांचा रोष ओढाऊन उघडपणे विखे यांचा प्रचार केला. केडगावच्या शिवसेनेनेही जगताप यांना शह देण्यासाठी विखे यांच्या मागे पुर्ण ताकद उभी केली. शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह सेना नगरसेवक, कोतकर गटाचे माजी नगरसेवक, भाजपमधुन विखे यांच्याकडे आलेले माजी नगरसेवक असी मोठी फौज विखे यांना ताकद देण्यासाठी मैदानात उतरली. याउलट जगताप समर्थकांची राजकीय कोंडी झाल्याने त्यांना उघड प्रचार करण्यात अनेक अडचणी आल्या. यामुळे जगताप यांच्या मागे केडगावमधील कोणतीच राजकीय शक्ती उघडपणे त्यांच्या मागे उभी राहिली नाही.
जगताप यांना विधानसभा निवडणुकीत केडगावमधुन २ हजार मतांची आघाडी मिळाल्यामुळे गेल्या २५ वर्षापासून सेनेला सुरू असलेल्या लीडची परंपरा मागील वेळी केडगावकरांनी मोडीत काढली. मात्र ज्या केडगावमुळे जगताप यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर झाला त्याच केडगावमधून विखे यांना तब्बल ८ हजार मतांचे दणदणीत लीड मिळाले. केडगाव मध्ये झालेल्या १६ हजार ४९९ मतांपैकी विखे यांना ११ हजार ९६९ मते तर आमदार संग्राम जगताप यांना केवळ ३ हजार ८४३ इतके मते मिळाली. विकासकामे करूनही मध्यंतरी केडगावकरांचा संपर्क तुटल्याने व केडगाव पॅटर्न तोपर्यंत विखे यांच्या मागे खंबीर उभा राहिल्याने त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारा कोणीच प्रभावी समर्थक जास्त पुढे आले नाहीत. यामुळे केडगाव मध्ये जगताप यांची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली .

केडगावात प्रचार टाळला
केडगाव हत्याकांडाची घटना घडल्यानंतर जगताप यांनी उघडपणे व पहिल्यासारखे केडगाव मध्ये येणे बंद केले होते. या निवडणुकीच्या प्रचाराच्या बैठकाही कुणाच्या तरी घरी घेण्यात आल्या. उघड प्रचार करणे मात्र त्यांनी टाळले त्याचाही परिणाम मतांची टक्केवारी कमी होण्यावर झाला.


विखे आता ‘केडगावकर’ होणार का ?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सुजय विखे यांच्यावर ‘परका’ म्हणुन आरोप झाले त्यावेळी त्यांनी भर सभेत आपण निवडुन आलो तर केडगावमध्ये जागा घेऊन तेथे घर बांधील व केडगावला राहयला येईल असे आश्वासन दिले होते. आता विखे खरच केडगावकर होणार का याची उत्सुकता लागली आहे.


Web Title: Kadgaon reinstates MLAs, Jagatap gets 8,000 lead
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.