नोकरी सोडून हर्षवर्धनने गाजविले कुस्तीचे मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:43 PM2020-01-08T12:43:44+5:302020-01-08T12:43:52+5:30

२०१६ मध्ये हर्षवर्धन सदगीर लष्करी सेवेत भरती झाला होता. कामावरही हजर झाला. मात्र त्याला अंगात भरलेली कुस्तीची उर्मी नोकरीत समाधान वाटू देत नव्हती. त्याचे नोकरीत मन रमेना. अखेर त्याने कुस्तीतच करिअर करायचे ही जिद्द बाळगून नोकरी सोडून देऊन अनेक कुस्तीची मैदाने गाजविली. 

Harshvardhan left the job and wrestled | नोकरी सोडून हर्षवर्धनने गाजविले कुस्तीचे मैदान

नोकरी सोडून हर्षवर्धनने गाजविले कुस्तीचे मैदान

Next

प्रकाश महाले । 
राजूर  : २०१६ मध्ये हर्षवर्धन सदगीर लष्करी सेवेत भरती झाला होता. कामावरही हजर झाला. मात्र त्याला अंगात भरलेली कुस्तीची उर्मी नोकरीत समाधान वाटू देत नव्हती. त्याचे नोकरीत मन रमेना. अखेर त्याने कुस्तीतच करिअर करायचे ही जिद्द बाळगून नोकरी सोडून देऊन अनेक कुस्तीची मैदाने गाजविली. 
हर्षवर्धनने आपले सातवीपर्यंतचे शिक्षण आपल्या कोभाळणे येथील जिल्हा परिषदेच्या व भाऊराव पाटील विद्यालयात घेतले. आठवीत शिकत असताना शेजारीलच केळी या गावाच्या शिवरात्रीच्या यात्रेत त्याने पहिली कुस्ती खेळली. कुस्तीचे कुठलेही डाव माहीत नसणारा हर्षवर्धन कुस्तीच्या श्रीगणेशातच हरला. मात्र याच कुस्तीने त्याला या खेळाविषयी कमालीचे आकर्षण जडले. 
आपल्याला कुस्ती शिकायची ही खूणगाठ मनाशी बांधत त्याने आपली इच्छा वडील मुकेश सदगीर यांच्याकडे व्यक्त केली. वडिलांनीही त्याची जिद्द आणि चिकाटी पहात पुढे इयत्ता आठवीसाठी भगूर येथे शालेय शिक्षणासाठी पाठवले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्याच्या वडिलांनी भगूर येथील बनकवडे व्यायामशाळेत त्याला पाठवले. याच व्यायामशाळेत तो कुस्तीचे धडे गिरवू लागला. शालेय शिक्षण घेत असताना अनेक शालेय व इतर ठिकाणच्या स्पर्धांमध्ये त्याने कुस्तीची मैदाने गाजविली. अनेक पारितोषिके त्याने या काळात मिळवली.
२०१६  मध्ये हर्षवर्धनची आर्मीत निवड झाली. तो कामावर हजरही झाला. मात्र अंगात भरलेली  कुस्तीची उर्मी त्याला नोकरीत समाधान वाटू देत नव्हती. या नोकरीत त्याचे मन रमेना . वडिलांकडे त्याने या बाबतीत आपले मन मोकळे केले. 
वडिलांनीही मागचा पुढचा विचार न करता त्याला मोकळीक दिली आणि अवघ्या चार महिन्यात हर्षवर्धनने नोकरी सोडली.   त्यानंतर त्याने थेट पुणे येथील काका पवार यांच्या तालमीत प्रवेश घेतला. या तालमीत मिळालेल्या कुस्तीच्या डावपेचांवर त्याने अनेक गदा मिळवल्या. हर्षवर्धनच्या कोंभाळणे येथील घरातील शोकेसमध्ये त्याने कुस्तीत पटकावलेल्या अनेक गदा आहेत. 
हर्षवर्धनने लष्करातील नोकरी सोडल्यानंतर पुणे येथील काका पवार यांच्या तालमीत प्रवेश घेतला. यापुढे तो कुस्तीशी एकरूप झाला. गेल्या तीन वर्षांपासून तो एकाही दिवाळीला घरी आला नव्हता. यावर्षी त्याला दिवाळीला ये म्हणून पुन्हा पुन्हा आग्रह केला होता. मात्र घरी येईल तो महाराष्ट्र केसरीची गदा घेऊनच असे हर्षवर्धनने सांगितले. आज त्याचे व आमचे स्वप्न साकार झाले. खूप आनंद झाला. झालेला आनंद कसा व्यक्त करू, अशी प्रतिक्रिया वडील मुकेश किसन सदगीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. आता हर्षवर्धनने हिंद केसरीची गदा मिळवावी. देशासाठी आॅलिंपिक खेळात कोंभाळणे या खेडेगावाचे व सदगीर कुटुंबाचे नाव जगभर झळकवावे हे एकच स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 


महाराष्ट्र केसरीची गदा मिळवायची ही हर्षवर्धनची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. त्याने ती पूर्ण केली. हर्षवर्धनमुळे अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदिवासी खेड्याचे नाव महाराष्ट्रात पोहचले आहे. हर्षवर्धनच्या यशामुळेच आज कोंभाळणेकरांचा उर भरून आल्याचे त्याचे आजोबा किसन मास्तर सदगीर यांनी सांगितले.

Web Title: Harshvardhan left the job and wrestled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.