Gram Panchayat member killed in tractor-motorcycle accident | ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात ग्रामपंचायत सदस्य ठार

ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात ग्रामपंचायत सदस्य ठार

जामखेड : भरधाव वेगात जाणा-या ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी-टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावच्या शिवारात घडली.

हा अपघात टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत घडला. या अपघाताच्या घटनेमध्ये जामखेड तालुक्यातील हळगावमधील माजी ग्रामपंचायत सदस्य आजीनाथ खोटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तात्याबा ढवळे हे गंभीर जखमी झाले आहेत.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील अजिनाथ भानुदास खोटे व उत्तम तात्याबा ढवळे हे दोघे जण मोटारसायकलवर (एम.एच.-१६, ए.एन.-२३३९) हळगावहून पंढरपूरला औषधे आणण्यासाठी गेले होते. पंढरपूर येथील जोशी आयुर्वेदिक हाॅस्पीटलमधून मधुमेहाची (शुगर) औषधे घेऊन दोघे सोलापूर–पुणे हायवेवरून गावी परतत असताना करमाळा ब्रीज खालून जाण्याऐवजी चुकून कुर्डूवाडी ब्रीज खालून कुर्डूवाडी रोड बरेच पुढे गेले. ब-याच वेळानंतर रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले. परत गाडी वळवून ते गावाकडे निघाले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या उसाच्या ट्रॅक्टरने (क्रमांक एम.एच.-४५, एस-३१२९) मोटारसायकलला धडक दिली. यात अजिनाथ खोटे (वय ६९) हे जागीच ठार झाले. खोटे हे हळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. उत्तम ढवळे (वय ६५) हे जखमी झाले. त्यांच्यावर टेंभुर्णी येथील पाटील हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.

    याप्रकरणी मयत अजिनाथ खोटे यांचा मुलगा संभाजी खोटे याने टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक नवनाथ आगतराव माळी (रा.परिते, ता.माढा, जि. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस करीत आहेत. खोटे यांच्या पश्चात दोन मुले, मुली, पत्नी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

 

Web Title: Gram Panchayat member killed in tractor-motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.