Forget the bitterness of the election, make the most of the opportunity | निवडणुकीतील कटूता विसरा, मिळालेल्या संधीचे सोने करा

निवडणुकीतील कटूता विसरा, मिळालेल्या संधीचे सोने करा

नेवासा : तालुक्‍यात काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्‍या निवडणुका चुरशीच्‍या होत असतानाही मुळा कारखान्‍याच्‍या सभासदांनी व उमेदवारी अर्ज भरलेल्‍या उमेदवारांनी मुळा कारखान्‍याची निवडणूक बिनविरोध केली. संस्‍थेच्‍या आणि सभासदांच्‍या हिताचा विचार करून त्‍यांनी हा सुज्ञ निर्णय घेतला. त्‍याबद्दल सर्वांचे आभार मानून स्‍थानिक पातळीवर ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीतून येणारी कटूता विसरून सर्वांनी कामाला लागावे व नवनिर्वाचित सदस्‍यांनी या संधीचे सोने करावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

मुळा कारखान्‍याची निवडणूक बिनविरोध झाल्‍याबद्दल सोनई (ता. नेवासा) येथे आयोजित केलेल्‍या आभार मेळाव्‍यात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख अध्‍यक्षस्थानी होते.

गडाख म्हणाले, कारखान्‍याच्‍या निवडणुकीत अनेक तोलामोलाचे उमेदवार होते. मी सर्वांशी बोललो. सर्वांना विश्‍वासात घेऊनच निर्णय घेतला. सर्वांनीच मनाचा मोठेपणा दाखविला आणि कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली. संचालक मंडळ कोणतेही असले तरी आतापर्यंत ज्‍या पद्धतीने कारखान्‍याच्‍या आणि सभासदांच्‍या हिताचा कारभार केला त्‍याच पद्धतीने पुढच्‍या काळातही कारखान्‍याचा कारभार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तालुक्‍यात ग्रामपंचायतीच्‍याही निवडणुका होत्‍या. काही बिनविरोध झाल्‍या. काही चुरशीच्‍या झाल्‍या. मात्र, आता त्‍यातून येणारी कटूता विसरून आता सर्वांनी कामाला लागले पाहिजे. नव्या सदस्‍यांनी सर्वांना बरोबर घेऊन संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी केले. सहकारी तत्त्वावर सूत गिरणीचा प्रकल्‍प उभारणीसाठी प्रयत्‍नशील असून, कृषी उत्‍पन्न बाजार समितीच्‍या नेवासा, कुकाणा आणि घोडेगाव येथे मिळून २०० ते २५० गाळ्यांचे शॉपिंग सेंटर बांधले जाणार आहेत, असेही गडाख यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी सभापती कारभारी जावळे, रावसाहेब कांगुणे, ॲड. अण्‍णासाहेब अंबाडे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

-------

मंत्रिपदाचा तालुक्याला उपयोग होईल..

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले, मुळा आणि ज्ञानेश्वर दोन्ही कारखान्यांचा कारभार चांगला आहे. त्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मुळा कारखान्याचे सर्व प्रकल्प चांगले चालू आहेत. आठ हजारांपर्यंत क्रशिंग होत आहे. कारखान्याचा कारभार चांगला आणि शिस्तशीरपणे सुरू आहे. इथेनॉलचा प्रकल्प उभारला जात आहे. तालुक्याला मंत्रिपद मिळाले आहे. अनेक वर्षानंतर चांगली संधी मिळाली आहे. त्याचा उपयोग आपल्या तालुक्याच्या विकासाला निश्चितपणे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फोटो : २४ मुळा

सोनई येथील मुळा कारखाना येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख.

Web Title: Forget the bitterness of the election, make the most of the opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.