कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग यशस्वी; पाथर्डीच्या पूर्व, दक्षिण भागात पडला दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 07:03 PM2019-08-23T19:03:18+5:302019-08-23T19:04:17+5:30

जोरदार झालेल्या पावसाने पाथर्डी तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

First artificial rain experiment successful; East of Pathardi, the southern region received heavy rainfall | कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग यशस्वी; पाथर्डीच्या पूर्व, दक्षिण भागात पडला दमदार पाऊस

कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग यशस्वी; पाथर्डीच्या पूर्व, दक्षिण भागात पडला दमदार पाऊस

googlenewsNext

पाथडी(अहमदनगर) : पाथर्डी तालुक्यातील पूर्व, दक्षिण भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. बुधवारी सायंकाळी चार वाजता कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केली. त्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दीड तास झालेल्या या पावसाने तालुक्यातील बंधारे ओसंडून वाहिले आहेत.

यंदा जूननंतर समाधानकारक पाऊस पडला नाही. जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी, बाजरी, मका आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मात्र तालुक्यातील पश्चिम भागात अद्यापही दुष्काळ कायम  असून अद्याप पाऊस पडलेला  नाही. त्यामुळे तालुक्यामध्ये पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. 

पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथील विमानतळावरून तालुक्यात प्रथमच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरावरील जमा झालेल्या ढगांवर सुमारे एक तास विमानातून रसायनाची फवारणी करण्यात आली. परंतु वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणावर असल्यामुळे रसायनांची फवारणी केलेले ढग मोहटा गावापासून पूर्व बाजूला सरकले. परंतु यामुळे मात्र करोडी, तिनखडी, मोहटा, कोरडगाव, भिलवडी, मोहजदेवढे, पिंपळगाव, टाकळीमानूर तसेच बीड  जिल्ह्यातील शिरूरपर्यंत या प्रयोगामुळे दमदार पावसाची सुरुवात झाली होती. 

कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याने येत्या कालावधीत अशा स्वरूपाचा प्रयोग पाथर्डी तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी राबवण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे. याबाबत तहसील प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. 
दरम्यान जोरदार झालेल्या पावसाने पाथर्डी तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

औरंगाबादच्या विमानांनी पाडला पाऊस
कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी बुधवारी तासभर जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात विमानाने  उड्डाण घेतले. ३९ एरोसोल्सच्या माध्यमातून रसायनांचा फवारा पाणी असलेल्या ढगांमध्ये करण्यात आला. कोरडगाव (पाथर्डी, अहमदनगर), मोहरी (पाथर्डी, अहमदनगर) पाथर्डी,  अमरापूर (शेवगाव, अहमदनगर) अशा ठिकाणी फवारणी करण्यात आली. विमानाने दुपारी ३ वाजून ५६ मिनिटांनी उड्डाण घातले आणि हे विमान सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी औरंगाबाद विमानतळावर उतरले.

बुधवारी १९ ठिकाणी ३८ नळकांड्या फवारण्यात आल्या. सी-डॉप्लर रडारवर पाणीदार ढगाच्या इमेज दिसल्यानंतर दुपारी वैमानिकाला उड्डाणाचे आदेश देण्यात आले. वैमानिक आणि सहवैमानिकांनी आदेशानुसार उड्डाण घेत प्राप्त माहितीनुसार फवारणी केली.  विमानाने ज्या ठिकाणी प्रयोग केला, त्याचे फोटो तसेच व्हिडिओ तेथील शेतकºयांनी विभागीय आयुक्तालयातील अधिकाºयांना पाठविल्याचे नोडल ऑफिसर तसेच विभागीय उपायुक्त सतीशकुमार खडके यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान 
असलेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी ९ तारखेपासून सुरूवात झाली. बुधवारी प्रयोगाचा तेरावा दिवस होता. या तेरावा दिवसांत फक्त चार दिवस विमान प्रयोगासाठी हवेत झेपावले. मंगळवारी विमानाने घनसावंगी परिसरात रसायनांची  (६ एरोसोल्स) फवारणी केली. मंगळवारी पाऊस झाला नाही,  मात्र बुधवारी केलेल्या प्रयोगाने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव तालुक्यात चांगलाच पाऊस बरसला.

Web Title: First artificial rain experiment successful; East of Pathardi, the southern region received heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.