कोपरगावात समृद्धी महामार्गाचे मुदतीत काम करण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:38 AM2021-09-27T10:38:57+5:302021-09-27T10:39:27+5:30

शिर्डी जोडणार कधी?; ३० पैकी केवळ ८ किमी रस्ता झाला पूर्ण.

Failure to work on Samruddhi Highway in Kopargaon on time pdc | कोपरगावात समृद्धी महामार्गाचे मुदतीत काम करण्यात अपयश

कोपरगावात समृद्धी महामार्गाचे मुदतीत काम करण्यात अपयश

googlenewsNext
ठळक मुद्देशिर्डी जोडणार कधी?; ३० पैकी केवळ ८ किमी रस्ता झाला पूर्ण

रोहित टेके
भाग ३

कोपरगाव (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिह्याच्या दहा गावांतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ३० किलोमीटर आहे. त्यापैकी पुलांचे अंतर २.५ किलोमीटर आहे. मात्र, काम सुरू झाल्यापासूनच गायत्री प्रोजेक्ट लि., हैदराबाद या ठेकेदार कंपनीचा प्रवास धीम्यागतीचा व तितकाच वादग्रस्त राहिला आहे.

सद्य:स्थितीत ५० टक्केच मातीच्या भरावाचे काम झाले आहे. अवघ्या ८ किलोमीटर सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत वाढून मिळूनही कंपनी वेळेत काम करण्यात अपयशी ठरली आहे. कंपनीने अनेक उप-ठेकेदारांना काम दिलेले आहे. हे काम करताना निर्बंधांचे पालन न केल्याने भरावासाठी मातीची वाहतूक करताना धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे रस्त्याच्या भरावासाठी मुरुमाऐवजी वापरण्यात आलेल्या मातीसंदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवली. मंत्रालय स्तरावर तक्रारी केल्या. मात्र, कोणीही त्याची दखल घेतली नाही.

३० किलोमीटर मार्गात लहान- मोठे एकूण १३७ पूल आहेत. 
त्यापैकी सर्वांत मोठे दोन इंटर चेंज आहेत. गोदावरी नदी, कोळ नदी, खडकी नदी, मनमाड- दौंड रेल्वेमार्ग, चांदेकसारे येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन, देर्डे- कोऱ्हाळे येथे दोन, असे एकूण आठ मोठे उड्डाणपूल आहेत. १०० बोगद्यांचे काम सुरू आहे. 

ठेकेदार कंपनीला ४६ कोटींचा दंड!
महामार्गाच्या भरावासाठी लागणाऱ्या माती-मुरुमाचे तालुक्यातील देर्डे - कोऱ्हाळे व धोत्रे येथील शेतकऱ्यांच्या शेतातून मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी गायत्री प्रोजेक्ट लि. कंपनीला ४५ कोटी ७७ लाख २९ हजार ६०० रुपये, तर डाऊच बुद्रुक येथील उत्खननासाठी रॅण्डबॅण्ड इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीला १३ लाख, असे दोन्ही मिळून ४५ कोटी ९० लाख २९ हजार ६०० रुपयांचा दंड केला. गेल्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये एकत्रित दंड ठोठावत पुढील कारवाईसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे पाठविला आहे.

भरावासाठी मुरूम वापरणे अभिप्रेत होते; परंतु सर्रासपणे मातीचा वापर केला आहे. हे सर्व माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ही बाब संबंधित कंपनीसह शासकीय अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिली; परंतु काहीच कारवाई झाली नाही. यासंदर्भात मी लवकरच न्यायालयात खटला दाखल करणार आहे.
बाळासाहेब जाधव, सामजिक कार्यकर्ते, कोकमठाण, कोपरगाव

Web Title: Failure to work on Samruddhi Highway in Kopargaon on time pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.