नगरमध्ये आठ बहुराष्ट्रीय कंपन्या लवकरच : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:39 AM2019-07-18T11:39:09+5:302019-07-18T11:40:50+5:30

पहिल्या टप्प्यात आठ कंपन्या येथील एमआयडीसीतील आयटीपार्क मध्ये सुरू होणार आहेत़

Eight multinational companies in city : Sangram Jagtap | नगरमध्ये आठ बहुराष्ट्रीय कंपन्या लवकरच : संग्राम जगताप

नगरमध्ये आठ बहुराष्ट्रीय कंपन्या लवकरच : संग्राम जगताप

Next

अहमदनगर : बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, पहिल्या टप्प्यात आठ कंपन्या येथील एमआयडीसीतील आयटीपार्क मध्ये सुरू होणार आहेत़ या कंपन्यांकडून लवकरच जॉब फेअरचे आयोजन करण्यात येईल़ नगर शहरासह जिल्ह्यातील सुमारे २५० ते ३०० तरुणांना या कंपन्यांमध्ये रोजगार मिळेल, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली़
येथील नागापूर औद्योगिक वसाहतीत आयटीपार्क उभारण्यात आला आहे़ परंतु,आयटी कंपन्या नगरमध्ये येत नव्हत्या़ त्यामुळे आयटी पार्क बंद होता़ तो सुरू करण्यासाठी काही आयटी कंपन्यांशी चर्चा सुरू होती़ या कंपन्यांनी नगरमध्ये येण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे, असे जगताप म्हणाले़
पहिल्या टप्प्यात आठ बहुराष्ट्रीय कंपन्या नगरमध्ये येत आहेत़ अन्य नामांकित कंपन्यांशी चर्चा सुरू असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी कंपन्या येतील़ पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या कार्यरत आहेत़ पुण्याच्या धर्तीवर नगर आयटी हब होईल़ त्यासाठी यापुढील काळातही प्रयत्न केले जातील़ तरुणांचा ओढा आयटीकडे आहे़ आयटी क्षेत्रात मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण होत आहे़
आयटी कंपन्या नगरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले़ आयटी कंपन्यांशी चर्चा केली़ त्यांनी नगर येथील आयटीपार्कची पाहणी केली़ त्यांना आवश्यक असलेल्या सुविधाही उपलब्ध आहेत़ त्यामुळे ते नगरला येण्यास तयार झाले़ प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपन्यांचे प्रतिनिधी नगरमध्ये येऊन गेले़
पुढील काही दिवसांत रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येणार आहे़ भरती प्रक्रिया पूर्ण करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे़ आयटी कंपन्यांच्या आवश्यकतेनुसार सुविधा पुरविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाणार असून,आयटी उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करून बड्या कंपन्यांना येथे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जगताप म्हणाले़

क्लस्टरला कर्जपुरवठा करण्यासाठी पाठपुरावा
एमआयडीसीत क्लस्टर उभारण्यात आले आहे़ त्याचा उद्योजकांना मोठा फायदा होत आहे़ परंतु, क्लस्टरसाठी निधी अपुरा पडत आहे़ त्यासाठी सरकारने कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे जगताप म्हणाले़

Web Title: Eight multinational companies in city : Sangram Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.