दहीहंडीत गोविंदांचे थरावर थर, पोलीस ठेवणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:51 PM2019-08-23T12:51:14+5:302019-08-23T12:51:35+5:30

कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक द्विगुणित करण्यात येत असला तरी थरावर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत.

 In Dahihandi, layer of Govindas will be kept, police will watch | दहीहंडीत गोविंदांचे थरावर थर, पोलीस ठेवणार नजर

दहीहंडीत गोविंदांचे थरावर थर, पोलीस ठेवणार नजर

googlenewsNext

चंद्रकांत शेळके
अहमदनगर : कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक द्विगुणित करण्यात येत असला तरी थरावर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत. सुरक्षिततेचे अनेक नियम असूनसुद्धा गोविंदा पथकांचे त्याकडे दुर्लक्ष होते व अपघात होतात. त्यामुळे यंदाच्या दहीहंडीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास गोविंदा पथक व आयोजकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबईसह राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तरूणाईत दंहीहंडी फोडण्याचा वेगळा उत्साह असतो. मुंबईच्या तुलनेत अहमदनगरमध्ये दहीहंडीचे प्रमाण कमी असले तरी लहान-मोठी सुमारे १५ ते २० मंडळे दहीहंडी उत्सव साजरा करतात. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा या निमित्ताने असते. यासाठी मोठ्या प्रमाणात इनामही लावले जातात. परंतु याबाबत कोणत्याही प्रकारची सुरक्षितता बाळगली जात नाही. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात होत असतात. अहमदनगरमध्ये सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी किंवा इतर अप्रिय घटना घडलेली नाही. तथापि, उत्सव साजरे करा, परंतु त्याबाबतचे नियम पाळा असे सांगण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. नगरमध्ये चार किंवा पाच थरांपेक्षा जास्त मोठी दहीहंडी बांधली जात नाही. त्यामुळे आतापर्यंत कोणतीही मोठी दुर्घटना या उत्सवात झालेली नाही.

नगरची दहीहंडी;मुंबई, ठाण्याचे गोविंदा पथक
अहमदनगरमध्ये माळीवाडा, मार्केट यार्ड, टिळक रोड, दिल्लीगेट, चितळे रोड, केडगाव, झोपडी कँटीन, सावेडी अशा भागात दहीहंडी उत्सव साजरा करणारे अनेक जुनी मंडळे आहेत. याठिंकाणी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी होते. मात्र गेल्या काही वर्षांत विविध मंडळांकडून सेलिब्रिटींना बोलावून, तसेच तरूणांकरवी मोठे शक्तीप्रदर्शन करून दहीहंडी साजरी केली जाते. नगरमध्येही अनेक मंडळांच्या दहीहंडीसाठी हिंदी, मराठी सिनेमासृष्टीतील अनेक नट-नट्या येत असतात. दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या रकमेची बक्षिसे असल्याने मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे येथून गोविंदा पथके नगरमध्ये येतात. या गोविंदांना सहा ते आठ थरांपर्यंतची दहीहंडी फोडण्याचा अनुभव असल्याने नगरची हंडी ते सहज फोडतात.

यंदा नगरमधील काही दहीहंडी मंडळे कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवणार आहेत. त्यामुळे ही मंडळे यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करून त्यासाठी होणारा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत.



दहीहंडीसाठी सुरक्षिततेची नियमावली आहे. त्याचे पालन सर्व मंडळांनी करणे आवश्यक आहे. हा उत्सव आनंदासाठी असतो. त्यामुळे तो आनंदानेच साजरा करावा. सर्व मंडळांच्या दहीहंडीकडे पोलिसांची नजर असेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कारवाई होईल. - ईशू सिंधू, जिल्हा पोलीस अधीक्षक

आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी प्रेरणा प्रतिष्ठानकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. प्रशासनाच्या नियमानुसार, तसेच सर्व परवानग्या घेऊन योग्य अंतरावरच दहीहंडी बांधली जाते. - बाबासाहेब गाडळकर, अध्यक्ष, प्रेरणा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव, माळीवाडा


अशी आहे नियमावली
१८ वर्षांखालील गोविंदांचा सहभाग नसावा.
२० फुटापेक्षा अधिक उंच दहीहंडी नसावी.
सुरक्षिततेची उपकरणे अत्यावश्यक.
मानवी मनोऱ्यावर पाण्याचा मारा करु नये.
कच्च्या, जुन्या इमारतीला दहीहंडी बांधू नये.
कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घ्यावी.
दहीहंडीच्या ठिकाणी कर्णकर्कश डिजेचा वापर टाळावा.
आपत्कालीन व्यवस्था असावी.

 

Web Title:  In Dahihandi, layer of Govindas will be kept, police will watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.