रचनात्मक ग्रामविकासाचे शिल्पकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 05:03 PM2019-08-20T17:03:10+5:302019-08-20T17:03:14+5:30

मारुतराव घुले यांनी १९७३ साली केंद्र शासनाकडून कारखान्याला परवानगी मिळविली. भेंडा येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. १२५० मेट्रीक टन ऊस गाळप क्षमतेचा साखर कारखाना १९७५ पासून सुरू झाला आणि परिसराचा चेहरामोहरा बदलला. शेवगाव-नेवासा तालुक्यात रचनात्मक ग्रामविकासाचे काम सुरु झाले़

 Craftsman of creative rural development | रचनात्मक ग्रामविकासाचे शिल्पकार

रचनात्मक ग्रामविकासाचे शिल्पकार

Next

अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील दादाजी बनकर पाटील व विठाबाई यांच्या उदरी विश्वनाथ यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३० रोजी झाला. दहिगावचे शंकरराव घुले पाटील हे दादाजी बनकर पाटलांचे नातेवाईक होते. परंतु त्यांना पुत्रप्राप्ती न झाल्याने विश्वनाथ यांना शंकरराव घुले पाटील यांना दत्तक देण्यात आले. यामुळे विश्वनाथ बनकर हे मारुतराव शंकरराव घुले पाटील झाले. त्यांनी इंटर आर्ट्सपर्यंत शिक्षण घेतले. उपजतच त्यांना समाजकार्याची आवड होती. श्रीरामपूर येथे शिक्षण घेत असताना शाळेतील गोरगरीब विद्यार्र्थ्यांना त्यांनी मदत केली. वसतिगृहात राहणाºया मुलांसाठी ते मित्रांच्या सहाय्याने धान्याची व पैशाची मदत गोळा करीत. तो काळ पारतंत्र्याचा होता. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत स्वातंत्र्यलढा समजावून घेतला. दहिगावी आल्यानंतर त्यांच्याकडे गावच्या पाटीलकीची सूत्रे आली. या काळात हैद्राबाद सरकारच्या सीमेवरून रझाकारांचा त्रास शेतकºयांना होत होता. तो त्रास कमी करण्यासाठी त्यांनी गावातील युवकांना एकत्र करून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करुन रझाकारांचा मुकाबला केला. तो काळ सावकारशाहीचा होता. गोरगरीब जनता सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडलेली होती. अनेकांच्या जमिनी सावकार कवडीमोलाने गिळंकृत करीत होते. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या स्थापनेत त्यांनी योगदान दिले़ बँकेमार्फत कर्जपुरवठा सुलभ व्हावा म्हणून गावोगावी सहकारी सोसायट्या स्थापन करण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित केले. शेतकºयांच्या शेतीमालाला योग्य किंमत मिळावी व शेतकºयांना योग्य किमतीत खते, अवजारे उपलब्ध व्हावीत म्हणून शेवगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघ या संस्था दीर्घकाळ चालविल्या. कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून शेवगाव येथे जिनिंग प्रेसिंग मिलची स्थापना केली.
मारुतराव घुले पाटील यांच्यावर महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव होता. खेड्यापाड्यात कर्मवीर भाऊराव पाटलांचे चाललेले शैक्षणिक कार्य पाहून ते प्रभावित झाले होते. आपल्याही परिसरातील शेतकरी, कष्टकरी, दलित, समाजाची मुले-मुली शिकले पाहिजेत, या हेतूने त्यांनी १९५९ साली दहिगाव-ने येथे जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून नवजीवन विद्यालय सुरू केले. वसतिगृह सुरू करून परिसरातील गोरगरीब मुलांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली. १९६० साली पंतप्रधान पंडित नेहरू नगर जिल्ह्याच्या दौºयावर असताना काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून नेहरूंसमोर त्यांनी जिल्ह्यातील प्रश्न मांडले. १९६१ साली झालेल्या अखिल भारतीय कृषक समाज या राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी संघटनेचे ते सदस्य झाले व नवी दिल्ली येथे शेतकरी परिषदेत हजर राहून शेतकºयांचे  प्रश्न समजून घेतले.                                                                                   
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १० वर्षे नगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. जिल्ह्यात काँग्रेस मजबूत केली. त्यांचे संघटन पाहून यशवंतराव चव्हाण यांनी १९६२ साली त्यांना शेवगाव- नेवासा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. ते प्रचंड मतांनी निवडून आले. १९६७ सालीही ते विधानसभेत निवडून गेले. विधानसभेत त्यांनी शेतकºयांचे प्रश्न पोटतिडकेने मांडले. शिक्षण हे सक्तीचे केले पाहिजे असा आग्रह धरला. १९६५ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे भव्य शिबिराचे नियोजन व संयोजन त्यांनी कुशलतने केले.
जायकवाडी धरण निर्मितीमुळे शेवगाव- नेवासा भागातील हजारो एकर काळी, कसदार जमीन पाण्याखाली गेली. त्या कठीण परिस्थितीत त्यांनी विस्थापितांना सावरले. धरणग्रस्तांचे पुनर्वसन व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. धरणग्रस्तांसाठी जायकवाडी धरणाचे ३ टीएमसी पाणी राखीव करून घेतले. गोदाकाठच्या शेतकºयांना जायकवाडी बॅकवॉटरचा लाभ मिळावा म्हणून वैयक्तिक पाईपलाईन, लिफ्ट योजना, वीजजोडणी यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. सहकारी बँकेमार्फत आर्थिक पुरवठा केला. त्यामुळेच आज गोदाकाठ समृद्ध झालेला दिसतो. जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शेवगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. तर शेवगाव-नेवासा भागातील शेतकºयांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून नेवासा येथे ज्ञानेश्वर महाविद्यालयाची, भेंडा येथे जिजामाता महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, वसतिगृह, आयटीआय, खेड्यापाड्यात माध्यमिक विद्यालये स्थापन करुन शिक्षणाचा प्रसार केला.
 मुळा धरणाचे पाणी शेवगाव-नेवासा भागातील शेवटच्या घटकापर्यंत मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. या पाण्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढले. उसासारखे नगदी पीक शेतकरी घेऊ लागला. शेवगाव-नेवासा परिसरात शेतकºयांच्या मालकीचा साखर कारखाना उभा राहिला पाहिजे, असा त्यांनी निश्चय केला. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, अण्णासाहेब शिंदे यांच्या सहकार्याने मोठ्या कष्टाने १९७३ साली केंद्र शासनाकडून कारखान्याला परवानगी मिळवली. भेंडा येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. १२५० मेट्रीक टन ऊस गाळप क्षमतेचा साखर कारखाना १९७५ पासून सुरू झाला आणि परिसराचा चेहरामोहरा बदलला. या भागात वीज मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले. दूरध्वनी  मिळवण्यासाठी प्रयत्न केले. नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिरासमोर पहिल्या वीज खांबाची पूजा करण्यात आली. नगर येथून लाकडी  खांब उभा करुन दूरध्वनी सुरू करण्यात आले. १९७२ साली त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. विधान परिषदेतही त्यांनी शेतकºयांचे मूलभूत प्रश्न मांडले. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पवारांसोबत तेही राष्ट्रवादी काँँग्रेसमध्ये गेले़ शेतकºयांच्या उसाला जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून त्यांनी अल्कोहोल निर्मिती प्रकल्प उभारला़ परंतु अल्कोहोलपासून दारू निर्मिती कटाक्षाने टाळली.
कारखान्याची गाळप क्षमता वाढवून विस्तारीकरण केले. कामगारांना स्वत:ची घरे बांधण्यासाठी कारखान्याच्या मालकीची जागा देऊन आर्थिक मदत केली. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कारखाना म्हणून नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. 
त्यांच्या पुरोगामी विचारसरणीचा प्रत्यय वेळोवेळी आला. महिला व  मागासवर्गीयांना राजकीय  आरक्षण नसतानाही त्यांनी त्याकाळी आपल्या दहिगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद व शेवगाव पंचायत समितीचे सभापतीपद मागासवर्गीय उमेदवारास दिले. १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत:च्या मुलाची उमेदवारी रद्द करून अल्पसंख्याक समाजातील पांडुरंग अभंग यांना उमेदवारी देऊन विधानसभेवर निवडून दिले. शिक्षण संस्था व साखर कारखान्यात अनेक शेतकरी, दलितांना नोकºया दिल्या. दुष्काळात गावकºयांना आठरापगड जातीतील लोकांना आपल्या घरचं धान्य मोफत वाटप करीत. 
 शेवगाव-नेवासा भागाला शेती, शिक्षण, वीज, पाणी, उद्योग या बाबतीत त्यांनी स्वयंपूर्ण केले. रचनात्मक ग्रामीण विकासाचा पाया त्यांनी घातला म्हणून या परिसराचे ते विकासाचे शिल्पकार ठरले आहेत. समाजकार्यात कार्यरत असतानाच त्यांचे ८ जुलै २००२ रोजी निधन झाले. त्यांचे चिरंजीव डॉ. नरेंद्र घुले पाटील चंद्रशेखर घुले पाटील यांनीही मारुतरावांचा वारसा पुढे चालविला आहे़ तिसरे सुपुत्र राजेंद्र घुले पाटील व्यवसायानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. नातू डॉ. क्षितिज घुले शेवगाव पंचायत समितीचे सभापती आहेत. स्नुषा राजश्रीताई घुले नगर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत. एक कर्तृत्वसंपन्न, कामाचा मोठा आवाका असणारे घुले पाटील कुटुंबीय मारुतराव घुले पाटील यांचे नवनिर्मितीचे स्वप्न साकार करीत आहेत.

लेखक - प्रा.भाऊसाहेब सावंत (ग्रामीण साहित्यिक, नेवासा)

Web Title:  Craftsman of creative rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.