‘कोरोना’ हाच बनला गुरू, जाणकारांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:44 PM2020-07-05T12:44:06+5:302020-07-05T12:45:41+5:30

अहमदनगर : कोरोनाने प्रत्येकाच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाला आहे. अनेक ग्रंथ, तत्त्वज्ञ आणि अनुभवातून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना मिळत ...

‘Corona’ became everyone's guru | ‘कोरोना’ हाच बनला गुरू, जाणकारांना काय वाटते?

‘कोरोना’ हाच बनला गुरू, जाणकारांना काय वाटते?

Next

अहमदनगर : कोरोनाने प्रत्येकाच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाला आहे. अनेक ग्रंथ, तत्त्वज्ञ आणि अनुभवातून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना मिळत असते. कोरोनाने मात्र सर्वांचेच जगणे बदलून टाकले आहे. कोरोनाने भल्याभल्यांना जमिनीवरही आणले आहे, तर अनेकांना जगण्याची नवी प्रेरणाही दिली आहे. माणसाची धडपड काही काळ शांत झाली आणि पुन्हा नव्या उमेदीसह सुरू झाली. माणसाला सर्व काही शिकविणारा ‘कोरोना’ हाच सर्वांचा गुरू बनला आहे. याबाबत जाणकारांना काय वाटते? गुरुपौर्णिमेनिमित्त ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी साधलेला हा आॅनलाईन संवाद.

-------------

निसर्गला गृहित धरू नका, निसर्गाची काळजी घ्या
नाती जपा, घरातल्याशी संवाद साधा
स्वच्छता असेल तर आजार जवळ येत नाहीत
प्रत्येकाने स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी
प्राणीमात्रांवर प्रेम करा
संकट मोठे असले तरी मात करता येते
जीवनशैलीमध्ये बदल करता येतो
जगात राहणारे सर्व समान आहेत
जगण्याची मर्यादा शिकवली

---------

श्रीमद्भगवतगीतेचा संदेश प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा आहे.  गीतेतील ‘करुण’ रसापेक्षा ‘विरह’ रस शिकविण्याची गरज आहे.  पृथ्वीवर असलेले आततायी संपविणे ही काळाची गरज आहे. कोरोनाने अनेकांना जमिनीवर आणले, अनेकांचा अहंकार गळाला. श्रीमंत असो की गरीब सर्वच घरात बसून होते. प्रत्येकाने आपल्या पायरीने आणि निसर्ग नियमाने जगावे, असा संदेश यातून मिळाला. एकांताशिवाय सुख आणि ज्ञान मिळू शकत नाही, हे कोरोनानेच शिकवले आहे.
    -अशोकानंद महाराज कर्डिले, निरुपणकार

-------------

कोरोना हे नैसर्गिक संकट नाही. कृत्रिम बॉम्बप्रमाणे हा विषाणू चीनने पसरविला. त्यामुळे हबकून जाण्याची गरज नाही. जमेल तसा या कोरोनाशी मुकाबला करणे, सदैव लढण्यासाठी सिद्ध राहणे गरज बनली आहे. चीनने कोरोना हा विस्तारवादाचे हत्यार म्हणून जगावर सोडले. मात्र भौतिक साधनांचा वापर करून त्याचा बिमोड करण्यासाठी तयार राहणे ही खरी ताकद कोरोनामुळे तयार झाली आहे. माणसाने इतर प्राण्यांचा संभाळ करण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे, याची शिकवण या संकटातून मिळाली आहे. जमिनीवर आणले, अहंकार गळाला या नकारात्मक बाजू सोडून घाबरून जाण्यात अर्थ नाही.  

 -डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, निवृत्त प्राचार्य 

-------------

कोरोनाने माणसाला खूप काही नवीन गोष्टी शिकवल्या आहेत. प्रत्येकाने स्वयंशिस्तीत जगणे आवश्यक झाले आहे. स्वत:ची काळजी घेऊन जगले पाहिजे. कोरोनाने आर्थिक नियोजन कोलमडले आले. त्यामुळे उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत जवळ असला पाहिजे, याची जाणीव कोरोनाने करून दिली आहे. आर्थिक नियोजन कोलमडले असल्याने प्रत्येकाच्या मनावर ताण आला आहे. आपल्यावर निसर्गासारखी एक शक्ती आहे, हेच माणूस विसरला होता. त्याची जाणीव झाली आहे. कोरोनाचे संकट अचानक आल्याने त्याला पेलण्यासाठी भारत देश सुसज्ज नव्हता, हेही आता उघड झाले आहे. जगण्यासाठी सदैव सज्ज पाहिजे, हेही कोरोनाने शिकवले.    

- डॉ. अमित सपकाळ, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: ‘Corona’ became everyone's guru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.