नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा अस्तित्त्वासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:20 PM2019-09-22T13:20:09+5:302019-09-22T13:20:34+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अस्तित्त्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे. भाजपच्या वाढलेल्या ताकदीमुळे शिवसेनेला त्यांच्या वाट्याला आलेल्या काही जागा सोडून द्याव्या लागण्याची शक्यता दिसत आहे. 

Congress-Nationalist struggle for existence in the city | नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा अस्तित्त्वासाठी संघर्ष

नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा अस्तित्त्वासाठी संघर्ष

Next

विधानसभेचे रणांगण
अहमदनगर : जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अस्तित्त्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे. भाजपच्या वाढलेल्या ताकदीमुळे शिवसेनेला त्यांच्या वाट्याला आलेल्या काही जागा सोडून द्याव्या लागण्याची शक्यता दिसत आहे. 
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असली तरी निवडणूक मोर्चेबांधणीत राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबतच शरद पवार आणि विखे यांच्यातील संघर्ष या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात आहे त्या जागा शाबूत ठेवण्याचे आघाडीसमोर आव्हान असणार आहे.
२०१४ च्या विधानसभेत काँग्रेस व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी ३, भाजपला ५ आणि शिवसेनेला एक जागा मिळाली होती. यावेळी काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच भाजपात प्रवेश केला आहे. अकोलेचे आमदार वैभव पिचड हेही भाजपवासी झाल्याने तेथे राष्ट्रवादीला फटका बसणार की एकत्र आलेले पिचडविरोधक काय चमत्कार करणार हेही पहायला मिळणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात स्थानिक उमेदवार नसल्याने शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे मैदानात उतरले आहेत. शिंदे-पवार यांची ही थेट लढत असली तरी ही लढत शरद पवार आणि राधाकृष्ण विखे यांच्याही प्रतिष्ठेची ठरणार आहे. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने तेथील राजकारण बदलले आहे. थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातही विखे यांनी लक्ष घातले असून थोरात यांच्याविरोधात तेथे भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे. याशिवाय शिर्डी मतदारसंघातही विखे यांच्याविरोधात कोणता  उमेदवार असेल, याकडेही राज्याचे लक्ष आहे.  या दोन मतदारसंघात थोरात-विखे यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटण्याची शक्यता 
आहे. भाजप-शिवसेना युती होणार की नाही, याचा अद्याप निर्णय झालेला नसला तरी दोन्ही पक्षातील इच्छुकांनी एकमेकांच्या जागांवर दावा केला आहे. त्यामुळे युती झाली तर अनेकांना घरी बसावे लागणार आह. 
पालकमंत्र्यांविरोधात पवार घराण्यातील उमेदवार
पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड हा हक्काचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले. शिवाय राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर ते आधी राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री बनले. साडेचार वर्षे ते जिल्ह्यात एकमेव मंत्री होते. आता त्यांच्यासमोर शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे मैदानात उतरले आहेत.गत दोन निवडणुकांत स्थानिक उमेदवार शिंदे यांना रोखू शकले नाहीत. स्थानिक उमेदवार न देता राष्टÑवादीने आता रोहित पवार यांना पुढे आणले आहे. 
भाजपचे आमदार वाढले
राधाकृष्ण विखे पाटील, मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड हे भाजपात आल्याने भाजपच्या विद्यमान आमदारांची संख्या तशी सातवर गेली आहे. याशिवाय विखे पाटील यांनी जिल्ह्यात युती बाराही जागा जिंकेल आणि युती झाली नाही तर भाजप बाराही जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांचा विश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे. गत विधानसभेला शिवसेनेला केवळ एकच जागा मिळाली होती. त्यामध्ये यावेळी वाढ होणार की शिवसेनेची जागाही भाजपच घेणार याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद मोठी असल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच थेट सामना पहायला मिळण्याची शक्यता आहे.
थोरात यांचीही कसोटी
अडचणीच्या काळात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे आलेली आहे. त्यांना जिल्ह्यातील काँग्रेससह राज्यातही लक्ष द्यावे लागणार आहे. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून थोरात यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाची मोठी कसोटी लागणार आहे.
नशिबी अन कमनशिबी
अहमदनगर विधानसभा चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यामुळे मतविभागणीमुळे संग्राम जगताप नशिबवान ठरले. तर शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराला ४५ हजारांच्यावर मते मिळूनही ते विजयापासून दूर राहिले. नेवासा मतदारसंघातही बाळासाहेब मुरकुटे यांचाही विजय सर्वाधिक चर्चेचा ठरला.
‘वंचित’चे काय
वंचित आघाडीने बाराही मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या आहेत. मात्र अद्याप कोणाचिही उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र प्रा. किसन चव्हाण, अरुण जाधव यांच्या नावांची चर्चा आहे. वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये मोठे मेळावे घेऊन एकप्रकारे विधानसभेचीच तयारी केली होती. 
 

Web Title: Congress-Nationalist struggle for existence in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.