भाकपच्या भाजप हटाव... देश बचाव मोहीमेला प्रारंभ

By अरुण वाघमोडे | Published: April 3, 2023 06:50 PM2023-04-03T18:50:07+5:302023-04-03T18:50:52+5:30

भाकपच्या भाजप हटाव देश बचाव मोहीमेला सुरूवात झाली आहे. 

 Communist Party of India's BJP Hatav Desh Bhachu campaign has started  | भाकपच्या भाजप हटाव... देश बचाव मोहीमेला प्रारंभ

भाकपच्या भाजप हटाव... देश बचाव मोहीमेला प्रारंभ

googlenewsNext

अहमदनगर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १४ एप्रिल ते १५ मे पर्यंत भाजप हटाव... देश बचाव! ही जनजागरण मोहीम देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई येथे सोमवारी झालेल्या राज्य कौन्सिल बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी दिली. मुंबईतील प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवन येथे पक्षाची राज्य कौन्सिल बैठक राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. बबली रावत व कॉ. ईश्‍वरा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

देशात गेली ९ वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी व विषमतेच्या खाईत लोटली जात आहे. देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली असून, एकूण लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली जात आहे. 

अशा परिस्थितीत हुकूमशाही पद्धतीचे निर्णय घेणाऱ्याआणि जनविरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट करत ही जनजागरण मोहीम सुरु करण्यात आली असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. बैठकीत बोलताना पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले, की भाजप सरकारने गेल्या ९ वर्षांच्या काळात संसदीय लोकशाही पद्धतीला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला आहे. अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून, समाजात दुही निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असून, जनतेला सशक्त डावा पर्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या राज्य कौन्सिल सदस्यांनी आणि जिल्हा सेक्रेटरींनी महाराष्ट्रात ही मोहीम राबविण्याबाबतचा कृतीआराखडा सादर केला.

 

Web Title:  Communist Party of India's BJP Hatav Desh Bhachu campaign has started 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.