खरंच पाच नगरसेवकांसाठी मुख्यमंत्री संतप्त? सेना-राष्ट्रवादीत चर्चेला उधाण

By सुधीर लंके | Published: July 8, 2020 06:04 AM2020-07-08T06:04:37+5:302020-07-08T06:07:43+5:30

पारनेर नगरपंचायतमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी गत आठवड्यात बारामतीला जाऊन अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Is CM really angry for five corporators? Army-NCP discussions abound | खरंच पाच नगरसेवकांसाठी मुख्यमंत्री संतप्त? सेना-राष्ट्रवादीत चर्चेला उधाण

खरंच पाच नगरसेवकांसाठी मुख्यमंत्री संतप्त? सेना-राष्ट्रवादीत चर्चेला उधाण

Next

- सुधीर लंके
अहमदनगर: पारनेर नगरपंचायतच्या पाच नगरसेवकांसाठी खरोखरच उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे का? याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम आहे. विधानसभेपूर्वीच तेथे सेनेत धुसफूस होती. त्यातूनच हे बंड घडले असून यास आम्ही नव्हे तर सेनाच जबाबदार आहे, असे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

पारनेर नगरपंचायतमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी गत आठवड्यात बारामतीला जाऊन अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार निलेश लंके यांची ताकद त्यामुळे वाढली आहे. या नगरसेवकांच्या पक्षांतराची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली असून ‘आमचे नगरसेवक परत पाठवा’, असा संदेश त्यांनी महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला पाठविला असल्याची चर्चा मुंबईत रंगली आहे.

पारनेर हा विधानसभेचा मतदारसंघ सेनेने गत निवडणुकीत गमावला आहे. सेनेचे नेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचा लंके यांनी येथे पराभव केला. लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत. सेनेचे तालुकाप्रमुख होते. औटी व त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. उद्धव ठाकरे हे २०१८ साली पारनेर दौऱ्यावर असताना लंके समर्थकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप झाला होता. तेव्हापासून लंके चर्चेत आहेत. सेना व त्यांच्यात तेव्हापासून जोरदार संघर्ष आहे. ही किनारही ठाकरे यांच्या नाराजीला असू शकते. 

सेनेने येथील नगरपंचायतची सत्ता ही विधानसभा निवडणुकीपूर्वीच गमावलेली आहे. या नगरपंचायतीत १७ सदस्यांपैकी ९ सेनेचे आहेत. पहिल्या अडीच वर्षात सेनेचाच नगराध्यक्ष होता. नंतरच्या अडीच वर्षात मात्र सेनेत बंडखोरी होऊन अपक्षाला नगराध्यक्षपद मिळाले. विधानसभेपूर्वीच हे बंड झाले होते. त्यामुळे आजच्या पक्षांतरालाही आम्ही जबाबदार नसून सेनेतील अंतर्गत नाराजी जबाबदार असल्याचे राष्टÑवादीचे म्हणणे आहे. अर्थात नगरपंचायतची निवडणूक तोंडावर असल्याने येथील सध्याच्या पक्षांतराचा लगेच नगराध्यक्ष पदावर काहीही परिणाम संभवत नाही.

पारनेरच्या शिवसेनेत अगोदरपासून धुसफूस आहे. अंतर्गत मतभेदांमुळे सेनेला बहुमत असूनही नगराध्यक्षपद राखता आलेले नाही. सेनेचे पाच नगरसेवक भाजपात निघाले होते. त्यांना राष्ट्रवादीत घेतले. यात चुकीचे काय आहे? मुख्यमंत्र्यांनीही याबाबत हरकत घेतली असेल असे आपणाला वाटत नाही. ही चर्चा केवळ मीडियात आहे.
- राजेंद्र फाळके,
जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी


आपल्यादृष्टीने पक्षांतराचा हा विषय संपलेला आहे. आपणाला या विषयावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही.
- विजय औटी,
माजी आमदार, शिवसेना


शिवसेनेचे कोणते नगरसेवक पक्ष सोडून गेले ती माहिती मातोश्रीने मागितली होती. ती यादी दिली. इतर काय घडामोडी सुरु आहेत, किंवा मुख्यमंत्री काय बोलले? हे माहित नाही.
- शशिकांत गाडे, दक्षिण जिल्हा प्रमुख, शिवसेना

Web Title: Is CM really angry for five corporators? Army-NCP discussions abound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.