वीज स्वस्त करणारे भाऊसाहेब थोरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 04:27 PM2019-08-17T16:27:38+5:302019-08-17T16:28:36+5:30

स्वातंत्र्य चळवळ, सहकार चळवळ आणि नंतर आमदारकीच्या माध्यमातून निळवंडे धरणाला शासनाची परवानगी मिळवून कालव्यांचा प्रश्नही मार्गी लावणारे भाऊसाहेब थोरात सर्वांनाच माहिती आहेत़ मात्र, भाऊसाहेबांनी महागडी वीज स्वस्त करुन सर्वसामान्यांना, शेतकºयांना उपलब्ध करुन देण्यात महत्वाचे योगदान दिले.

Bhausaheb Thorat, who makes electricity cheaper | वीज स्वस्त करणारे भाऊसाहेब थोरात 

वीज स्वस्त करणारे भाऊसाहेब थोरात 

googlenewsNext

अहमदनगर : संगमनेर कोरडवाहू, दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध होता. या तालुक्याचे नंदनवनात रूपांतर करण्याचे श्रेय नि:संशयपणे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना जाते. संगमनेर तालुक्याचा जो काही विकास झाला तो सहकारी चळवळीतून झाला़ त्या सहकाराचे नेतृत्व भाऊसाहेब थोरातांनी केले आहे. आमदारकीच्या काळात निळवंडे धरणाला मंजुरी मिळवून कालव्यांचे भूमिपूजनही त्यांनी घडवून आणले़ कामाचा झपाटा असा क्वचितच आमदारांच्या ठायी आढळतो़ भाऊसाहेब थोरात यांच्या जीवन कार्याचे दोन भाग पडतात. पहिला भाग आहे स्वातंत्र्य चळवळीचा आणि दुसरा स्वातंत्र्योत्तर सहकार चळवळीचा.
विद्यार्थी दशेत असताना ते अण्णासाहेब शिंदे, भास्करराव दुर्वे यांच्या संपर्कात आले. भास्करराव दुर्वे नाना यांनी उत्तर नगर जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले होते़ ८ आॅगस्ट १९४२ ला महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’ चा इशारा दिला़ इंग्रजांनी काँग्रेस नेत्यांची धरपकड केली़ गांधी, नेहरू, आझाद, पटेल असे महत्वाचे नेते तुरुंगात डांबले़ त्यामुळे देशात खूप मोठा आगडोंब उसळला़ ब्रिटिशांना घालवण्यासाठी लोकांनी संप, मोर्चे, हरताळ पाळून उग्र आंदोलने केली. ब्रिटिशांनी गोळीबार, धरपकड, बॉम्ब वर्षाव आदी मार्गांनी हे आंदोलन दडपले़ त्यामुळे थोडा काळ स्मशान शांतता पसरली़ परंतु पुन्हा उठाव सुरु झाले. देशात भूमिगत चळवळ सुरु झाली़ त्याचे नेतृत्व साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन आदींनी केले. नगर जिल्ह्यात या भूमिगत आंदोलनाचे नेतृत्व दुर्वे नानांकडे आले़ अण्णासाहेब शिंदे, धर्मा पोखरकर, भाऊसाहेब थोरात आदी त्यांचे सहकारी होते.
दुर्वे नानांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब, भाऊसाहेब आदी मंडळींनी पट्टाकिल्ला परिसरात भूमिगत आंदोलन केले़ टेलिफोनचे खांब पाडणे, तारायंत्राच्या तारा तोडणे, रेल्वे रूळ उखडवणे, पोस्ट आॅफिस आणि सरकारी कचेरीवर तिरंगा फडकवणे इत्यादी प्रकारचे कार्य करून या मंडळींनी इंग्रजांना सळो की पळो केले़ हे कार्य करताना या सगळ्या मंडळींना अटक झाली़ तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात असताना अण्णासाहेब शिंदे यांनी साम्यवादी चळवळीचा अभ्यास केला़ त्या विचाराने ते प्रभावित झाले़ तुरूं गातून बाहेर येताच त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व स्वीकारले़ त्यांच्यासमवेत भाऊसाहेब थोरातही कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले़ त्यांनी विडी कामगारांची संघटना मजबूत करून कामगार चळवळीचे नेतृत्व केले. स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्टांनी काही उठाव केले ते मोडून काढण्यात सरकारला यश आले. कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेवर चौफेर टीका होऊ लागल्याने भाऊसाहेब नाराज झाले़ त्यांनी चळवळीपासून स्वत:ला अलिप्त केले.
जोर्वे येथील शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. भाऊसाहेब थोरातांना जोर्वे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्षपद देण्यात आले़ त्यामुळे ते सहकार चळवळीत कार्यरत झाले़ सहकार चळवळीत खूप ऊर्जा आहे़ त्यातून लोकांचे प्रश्न सोडवता येतात, याची त्यांना खात्री पटली़ येथूनच त्यांच्या जीवनातील दुसºया टप्प्याची सुरुवात झाली. रचनात्मक कामाची उभारणी सुरु झाली.
जोर्वे सेवा सोसायटीच्या माध्यमातून त्यांचा तालुका सुपरवायझिंग फेडरेशनशी संबंध आला. त्याचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालत आले. तालुका सुपरवायझिंग फेडरेशनचे काम करतानाच भाऊसाहेब व त्यांच्या सहकाºयांनी संगमनेर तालुका शेतकी संघाची स्थापना केली. या संघामार्फत शेतकºयांना बियाणे, खते, कृषिपंप इत्यादी शेतीपूरक साहित्य विक्री चालू केली़ हा शेतकी संघ त्यांनी किफायतशीर व दर्जेदार पद्धतीने चालवल्यामुळे शेतकºयांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास निर्माण झाला. त्यातून संगमनेरला सहकारी साखर कारखाना काढला पाहिजे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला़ कारखान्यासाठी शेअर्स गोळा करणे हे मोठे आव्हानात्मक काम होते़ त्यासाठी त्यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसमवेत तालुक्यात शेतकºयांचे मेळावे घेतले़ त्यांना कारखान्याविषयी माहिती देऊन सभासद होण्यासाठी तयार केले़ शेतकºयांचे शेअर्स गोळा केले़ याच दरम्यान यशवंतराव चव्हाणांच्या मध्यस्थीने अण्णासाहेब शिंदे व त्यांच्या सहकाºयांनी कम्युनिस्ट पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला़ भाऊसाहेबांनीही त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
१९६२ सालच्या निवडणुकीत अण्णासाहेब शिंदे खासदार तर बी़ जे़ खताळ पाटील आमदार म्हणून निवडून आले़ दोघेही मंत्री झाले. त्यामुळे संगमनेर साखर कारखाना निर्मितीच्या कामाला गती आली़ दोन्ही मंत्र्यांनी या कामी मोलाचे सहकार्य केले. याच काळात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब थोरात यांची निवड झाली.
केंद्रात अण्णासाहेब शिंदे मंत्री, राज्यात खताळ पाटील मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्षपद थोरात यांच्याकडे़ त्यामुळे संगमनेर तालुक्यातील सहकार चळवळीला अधिक बळकटी मिळाली़ संगमनेर साखर कारखान्याच्या कामाला गती आली. केंद्रातून परवानगी मिळाली़ राज्यसरकारने भाग भांडवल, कर्ज, निधी उभारणीस सहकार्य केले. जिल्हा बँकेने भक्कम आर्थिक पाठिंबा दिला. यामुळे १९६७ साली संगमनेर साखर कारखाना प्रत्यक्ष सुरु झाला़ या कारखान्याची उभारणी आणि प्रत्यक्ष गाळप यात भाऊसाहेबांनी स्वत:ला झोकून दिले होते़ त्यामुळे विठ्ठलराव विखे आणि भाऊसाहेब धुमाळ या शासननियुक्त अध्यक्षांच्या प्राथमिक कालखंडानंतर पहिल्यांदा जी निवडणूक झाली, त्यात सभासदांनी कारखान्याचे नेतृत्व भाऊसाहेब थोरात यांच्याकडे सोपवले. भाऊसाहेबांनी कारखान्याचे व सहकार चळवळीचे नेतृत्व समर्थपणे केले.
साखर कारखाना चालवण्यासाठी उसाची उपलब्धता महत्वाची असते़ ऊस पिकासाठी भरपूर पाणी लागते़ तालुक्यात ऊस लागवड वाढवण्याची मोहीम संगमनेर साखर कारखान्याने हाती घेतली़ त्यासाठी हरिश्चंद्र पाणीपुरवठा संस्था स्थापन केली़ तिच्यामार्फत प्रवरा नदीच्या दोन्ही बाजूला १० किलोमीटर लांबीचे लिफ्ट इरिगेशन योजना राबवण्याचा सपाटा लावला़ त्याला जिल्हा बँकेने अर्थपुरवठा केला़ त्यातून तालुक्यात ऊस क्षेत्र वाढले़ परंतु त्यातून नवा पेच निर्माण झाला. पूर्वेकडील तालुक्यांनी संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीतून पाणी उपसण्याला विरोध केला. भंडारदरा धरणातील पाण्याचे  ब्लॉकनुसार जे वाटप होते, त्यात संगमनेर तालुक्याला थेंबभरही पाणी मिळाले नव्हते. पूर्वेकडील नेते संगमनेर तालुक्यातील शेतकºयांना पाणी चोर म्हणून हिणवू लागले. याविरुद्ध भाऊसाहेबांनी मोठा उठाव केला़ जनआंदोलने झाली़ त्याला यश आले. प्रवरा नदीच्या पाण्याचे फेरवाटप करणे शासनाला भाग पडले. संगमनेर अकोले तालुक्याला हक्काचे ३० टक्के पाणी मिळाले.
भाऊसाहेबांनी साखर कारखाना काटकसरीने व सचोटीने चालवला़ लबाडी, स्वार्थ, फसवणूक यांपासून सहकारी चळवळ बाजूला ठेवली. भाऊसाहेब थोरात यांच्या करारी, चारित्र्यसंपन्न, परखड, सुस्पष्ट, दूरदर्शी, शिस्तबद्ध नेतृत्वामुळे कारखान्याची प्रगती झाली़ या कारखान्याने शेतकºयांच्या उसाला इतर कारखान्यांच्या तुलनेत सतत अधिक भाव दिला़ त्यामुळे कारखान्याचा देशभर नावलौकिक वाढला. लोकांनी निवडून दिलेल्या सहकारातील प्रतिनिधींनी संस्थेच्या हिताची काळजी करायची असते़ त्यातून स्वत:साठी काही घ्यायचे नसते़ उलट स्वत:चेच काही संस्थेला देता आल्यास द्यावे, अशी त्यांची शिकवण होती.
१९७७ साली भाऊसाहेब थोरात काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेला उभे राहिले. या निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील या दिग्गज उमेदवाराचा पराभव केला. भाऊसाहेब थोरात आमदार झाले. या आमदारकीचा उपयोग त्यांनी निळवंडे धरणाची परवानगी मिळवण्यासाठी केला. निळवंडे धरण हाच संगमनेर तालुक्यातील पाणी टंचाई घालवण्याचा उत्तम उपाय आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. निळवंडे धरण व्हावे यासाठी त्यांनी पाणी परिषदा घेतल्या़ राज्य सरकारला निळवंडे धरणाची अपरिहार्यता पटवून दिली. डावा आणि उजवा कालवा काढला तर खूप मोठे शेती क्षेत्र ओलिताखाली येईल, हे त्यांनी दांडेकर, देऊस्कर, देशमुख या त्रिसदस्यीय समितीला पटवून दिले. धरणाच्या परवानगीतील सर्व अडथळे दूर केले. धरणाला परवानगी तर मिळवलीच़ पण, निळवंडे कालव्याचे भूमिपूजनही त्यांच्या आमदारकीच्या काळात घडवून आणले. भाऊसाहेब थोरात आमदारकीत रमले नाहीत. त्यांना अकारण लोकानुनय मान्य नव्हता़ त्यामुळे ते पुन्हा कधी आमदारकीच्या नादी लागले नाहीत. आमदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले नाहीत.
शेतकºयांना मीटरनुसार वीजबिल येत असे़ ते शेतकºयांना परवडत नव्हते़ त्याचवेळी राज्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दराने वीज पुरवठा केला जात होता. हे धोरण अन्यायकारक आहे, अशी भाऊसाहेबांची भूमिका होती. शेतकºयांना मीटरऐवजी अश्वशक्तीनुसार बिल आकारावे, अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी राज्यभर फिरून या मागणीच्या मागे शेतकºयांचा जनाधार उभा केला. ऐतिहासिक मीटर हटाव आंदोलन केले़ राज्यभर त्याचा बोलबाला झाला. शासनाला मीटरऐवजी अश्वशक्तीनुसार म्हणजेच विजेच्या वापरानुसार वीजबिल आकारणीचा निर्णय घ्यावा लागला़ जेव्हढे रिडींग पडतील, तेव्हढेच वीज बिल आकारण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला़ त्यामुळे सर्वसामान्य, शेतकरी यांच्या आवाक्यात वीज आली़ 
अण्णासाहेब शिंदे केंद्रात कृषी मंत्री असताना वर्गीस कुरियन यांनी गुजरातमध्ये अमूल दूध प्रकल्प यशस्वी करून दाखवला़ देशात श्वेतक्रांती झाली. भाऊसाहेब थोरात या क्रांतीने प्रभावित झाले़ त्यांनी संगमनेर तालुक्यात आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्याचा चंग बांधला. त्यासाठी जिल्हा बँकेची मदत घेतली. अधिक दूध देणाºया संकरित दुधाळ गायींचे वाटप केले़ त्याचे पालन व संगोपनासाठी शास्त्रशुद्ध माहिती देणारी मदत यंत्रणा उभी केली. चारा, औषधे, पशुखाद्य, व्हेटरनरी डॉक्टर्स उपलब्ध करून दिले़ तालुक्यात दूध धंद्यात क्रांती घडवून आणली.
संगमनेर तालुक्यात दररोज सुमारे ५ लाख लीटर दुधाचे संकलन होते़ राजहंस ब्रँड सहकारी दुधाचा राज्यात मोठा नावलौकिक आहे. भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यात गावोगावी दुधाळ गायींपालन, दूध संकलनासाठी सहकारी दूध डेअरी, त्याला जोडून पतसंस्था आणि शाळा याची साखळी निर्माण केली़ त्यामुळे तालुक्यात रोजगार निर्माण झाला़ सुबत्ता निर्माण झाली.
भाऊसाहेब थोरात यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली़ मासेमारी, कुक्कुटपालन, पाणीपुरवठा, पतसंस्था यांच्यासाठी खूप चांगले निर्णय त्यांच्या काळात झाले. त्यांनी नाबार्डचे संचालक म्हणूनही काम केले़ त्याचाही फायदा त्यांनी राज्याला करून दिला. भाऊसाहेब थोरात यांनी लेखक, कवी, कलावंत, नाटककार, शास्त्रज्ञ, पत्रकार, खेळाडू यांचा सातत्याने सन्मान केला. स्वत:ही काही लेखन केले. भाऊसाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नामुळे संगमनेर तालुक्याचा खूप मोठा विकास झाला आहे. त्यामुळे त्यांना संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून संबोधले जाते. त्यांनी सहकार चळवळ वाढवली. फुलवली़ यशस्वी केली़ म्हणूनच जनतेने त्यांना सहकार महर्षी ही पदवी बहाल केली.

लेखक - हिरालाल पगडाल (सामाजिक कार्यकर्ते )

Web Title: Bhausaheb Thorat, who makes electricity cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.