यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय, जिद्द, चिकाटी आवश्यक; विनोद बढे यांचा मराठा समाजातील तरुणांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:24 PM2019-11-24T13:24:43+5:302019-11-24T13:27:11+5:30

तरुणांनो, उठा जागे व्हा. शिका, कष्ट करा, ध्येय ठेवा..यशस्वी उद्योजक व्हा, असा सल्ला मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक विनोद बढे यांनी मराठा समाजातील युवकांना दिला. उद्योग कितीही छोटा असला तरी त्याची लाज न बाळगता पुढे आले पाहिजे.

To become a successful entrepreneur, the goal is persistence, persistence; Vinod Verde advises young people in Maratha community | यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय, जिद्द, चिकाटी आवश्यक; विनोद बढे यांचा मराठा समाजातील तरुणांना सल्ला

यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय, जिद्द, चिकाटी आवश्यक; विनोद बढे यांचा मराठा समाजातील तरुणांना सल्ला

googlenewsNext

संडे स्पेशल मुलाखत / अनिल लगड ।  
तरुणांनो, उठा जागे व्हा. शिका, कष्ट करा, ध्येय ठेवा..यशस्वी उद्योजक व्हा, असा सल्ला मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक विनोद बढे यांनी मराठा समाजातील युवकांना दिला. उद्योग कितीही छोटा असला तरी त्याची लाज न बाळगता पुढे आले पाहिजे. ही चळवळ कोणाच्या विरोधात नाही. कुणाशी स्पर्धा करण्याशी नाहीतर मराठा समाजातील उद्योजकांना सर्वांच्या बरोबरीने पुढे नेण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.  
१९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे मराठा उद्योजक लॉबीचा मेळावा पार पडला. राज्यभरातून मराठा उद्योजक या मेळाव्यात सहभागी झाले होते. बढे यांनी आपल्या टिमसोबत ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत राजेश सोनवणे, धिरज मोढवे, राजेंद्र औताडे, संदीप खरमाळे, स्वप्नील काळे, चिंतेश्वर देवरे, सुदर्शन झिंजुर्डे उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’ने बढे  यांच्याशी संवाद साधला.  . 
उद्योग क्षेत्रात आपला प्रवास कसा राहिला?
माझे मूळ गाव नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली. वडील नोकरीनिमित्त उल्हासनगरला आले. तेथे त्यांनी एका वायर फॅक्टरीत काम सुरू केले. दहा वर्षे कंपनीत काम केले. त्यानंतर वडिलांनी एका जैन समाजातील व्यक्तीबरोबर भागीदारीत व्यवसाय सुरू केला. त्यानंतर १९८७ मध्ये वडिलांनी जमीन विकून स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. आता जीन्स् पँट बनविण्याचा व्यवसाय आहे. यामुळे मला व्यवसायाचे लहानपणापासूनच धडे मिळाले आहेत. 
मराठा उद्योजक लॉबी कशासाठी? 
कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा सहभाग आहे. परंतु यात अवेळी पडणारा पाऊस, दुष्काळ यामुळे शेती क्षेत्र मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. मराठा समाज या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे. त्यातच मराठा समाजातील युवकांना नोकºयाही नाहीत. त्यामुळे अनेक तरुण छोट्या-मोठ्या उद्योगाकडे वळत आहेत. या तरुणांना मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे. 
उद्योजक लॉबीची संकल्पना कशी सुचली?
मराठा उद्योजक लॉबीची संकल्पना मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने खºया अर्थाने मला सुचली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी क्रांती मोर्चा काढण्यात आला. याला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मराठा क्रांती मोर्चामुळे मराठा समाज एकवटला. एकजुटीची ताकद सरकारला देखील कळाली. पण क्रांती मोर्चाचा फक्त आरक्षण हाच विषय होता. माझा विषय मात्र वेगळा आहे. यातून मलाही मराठा उद्योजक लॉबीची कल्पना सुचली. 
मराठा लॉबीत आता किती जणांचा सहभाग आहे?
एकीचे बळ काय असते हे मराठा क्रांती मोर्चाने दाखवून दिले. त्यातून आज मराठा उद्योजक लॉबी उभी राहिली आहे. ही लॉबी उभी करण्यासाठी मला सोशल मीडियाचा मोठा फायदा झाला. आज जवळपास फेसबुकवर साडेचार लाख उद्योजकांचा ग्रुप तयार झाला आहे. तर व्हॉटस् अ‍ॅपवर ७० ग्रुप तयार झाले आहेत. यात जवळपास दीड लाख उद्योजक जोडले गेले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना मराठा उद्योजक लॉबीचा हेल्पलाईन नंबर दिला आहे. याव्दारे कोणाला कोणतीही अडचण आली तर तत्काळ एकमेकांना मदत करुन सोडविली जाते.
राज्यातील मराठा उद्योजकांना कसे एकत्र केले?
उल्हासनगरला सिंधी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यात जिद्द आणि चिकाटी मोठी आहे. त्यांच्यातील लॉबिंग पाहिले आहे. त्यांची उद्योगातील देवाण-घेवाणीच्या पध्दती जाणल्या आहेत. त्यातून २०१७ मध्ये मराठा उद्योजक लॉबी उभी करण्याचे काम सुरू केले. मला युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रथम मी हे काम मुंबई, उल्हासनगर, ठाणे, कोल्हापूर, भिवंडी, जळगाव येथे केले. तेथे मेळावे घेतले. संकल्पना समजून सांगितली. अडचणी समजून घेतल्या. त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. 
 अहमदनगरच्या मेळाव्याला प्रतिसाद कसा राहिला?
नगरला मेळावा खूप चांगला झाला. प्रतिसाद चांगला मिळाला. औरंगाबाद, नाशिक, बीड, जालना जिल्ह्यातून लोक आले होते. अनेक स्टॉल लागले होते. आता जानेवारीमध्ये नगरला नामवंत तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे. यात छोट्या अगदी चहा, पानटपरी, भाजीपाला विक्री करणाºयांना देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात व्यवसाय कसा निवडावा? भांडवल किती लागेल? भांडवलाची उभारणी कशी करावी? मालाचे ब्रँडींग कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
मराठा उद्योजक तरुणांना काय संदेश द्याल?
मराठा समाजातील तरुणांनी चांगले शिक्षण घ्यावे. परंतु शिक्षणाबरोबरच व्यवसायाशी निगडीत शिक्षण घ्यायला हवे. कारण नोकरी मिळाली नाही तर किमान व्यवसाय कसा उभारता येईल, याचेही ज्ञान घ्यायला हवे. मराठा समाजातील तरुणांनी आज जागे होण्याची गरज आहे. कष्ट, जिद्द ठेवून स्वत:च्या पायावर उभे रहावे, ही अपेक्षा आहे.

मराठा उद्योजक लॉबी ही एक मराठा समाजातील प्रत्येक युवकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली व्यावसायिक चळवळ आहे. आमच्या लॉबीत पद ही संकल्पना नाही. सर्वांना समान अधिकार आहे. राजकीय हस्तक्षेप तर मुळीच नाही.   -विनोद बढे 

Web Title: To become a successful entrepreneur, the goal is persistence, persistence; Vinod Verde advises young people in Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.