Video - विखेंच्या ताफ्यासमोर थोरात समर्थकांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:44 PM2019-09-19T12:44:14+5:302019-09-19T12:50:13+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय मंत्री विखे घेत असल्याचा आरोप थोरात समर्थकांनी करत विखेंचा ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

balasaheb thorat supporters protest against radhakrishna vikhe patil in sangamner | Video - विखेंच्या ताफ्यासमोर थोरात समर्थकांची घोषणाबाजी

Video - विखेंच्या ताफ्यासमोर थोरात समर्थकांची घोषणाबाजी

googlenewsNext
ठळक मुद्देबाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय मंत्री विखे घेत असल्याचा आरोप थोरात समर्थकांनी करत विखेंचा ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. राधाकृष्ण विखे बुधवारी सायंकाळी  संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर व राजापूर येथे आले होते. पोलिसांनी थोरात समर्थकांना रोखत पुलाच्या उदघाटन ठिकाणी जाऊ न देता सरकारी वाहनात बसवून ठेवले.

संगमनेर (जि. अहमदनगर) - गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे बुधवारी (18 सप्टेंबर) सायंकाळी संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथे आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय मंत्री विखे घेत असल्याचा आरोप थोरात समर्थकांनी करत विखेंचा ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखत बाजूला नेले. 

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे बुधवारी सायंकाळी  संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर व राजापूर येथे आले होते. उर्ध्व प्रवरा डाव्या कालव्यावरील म्हाळुंगी पुलाचे उदघाटन तसेच उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे 2) कालवा कामांचा शुभारंभ मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आला. विखे हे संध्याकाळी निमगाव भोजापूर येथे जात असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात समर्थकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी थोरात समर्थकांना रोखत पुलाच्या उदघाटन ठिकाणी जाऊ न देता सरकारी वाहनात बसवून ठेवले. उदघाटन झाल्यानंतर त्यांना वाहनातून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर विखे राजापूरकडे निघाले असता थोरात समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखत बाजूला नेले. दरम्यान काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

निमगाव भोजापूर येथे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे आल्यानंतर त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात समर्थक काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी थोरात समर्थकांना सरकारी वाहनात बसवून ठेवले होते. दरम्यान निमगाव भोजापूर व राजापूर या दोन्ही गावात थोरात-विखेंची फ्लेक्सबाजी चांगलीच रंगलेली पहायला मिळाली. 

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हाळुंगी नदीवरील पुलाचे उद्घाटन सत्तेचा गैरवापर करून केले. सदर काम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यानेच पूर्ण झाले आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष थोरातांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम विखे करीत आहेत. त्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलीस बळाचा वापर करून सदर उद्घाटन करण्यात आले. येथून पुढील उद्घाटने पोलीस बळाचा वापर न करता करून दाखवावी.

 - आनंद वर्पे, युवक काँग्रेस, संगमनेर तालुकाध्यक्ष.

Web Title: balasaheb thorat supporters protest against radhakrishna vikhe patil in sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.