क्रीडाधिका-यांच्या वादात बॅडमिंटन स्पर्धेचा ‘खेळ’; खेळाडूंची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 03:09 PM2020-01-05T15:09:00+5:302020-01-05T15:10:16+5:30

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिका-यांच्या वादात राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचाच खेळ झाल्याचे चित्र आहे. जबाबदारीची टोलवाटोलवी करण्यातच अधिकारी मशगूल असून, त्यामुळे नियोजनाअभावी रात्री ९ वाजेपर्यंत खेळाडूंची फरपट होत आहे.

Badminton tournament 'game' by sports officials; Athlete of the player | क्रीडाधिका-यांच्या वादात बॅडमिंटन स्पर्धेचा ‘खेळ’; खेळाडूंची फरपट

क्रीडाधिका-यांच्या वादात बॅडमिंटन स्पर्धेचा ‘खेळ’; खेळाडूंची फरपट

googlenewsNext

अहमदनगर : राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा नगरला होणे ही अभिमानास्पद बाब आहे, असे सांगत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या स्पर्धेचे कौतुक केले. मात्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिका-यांच्या वादात राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचाच खेळ झाल्याचे चित्र आहे. जबाबदारीची टोलवाटोलवी करण्यातच अधिकारी मशगूल असून, त्यामुळे नियोजनाअभावी रात्री ९ वाजेपर्यंत खेळाडूंची फरपट होत आहे.
 स्पर्धेच्या आरंभापासून अधिका-यांमधील वाद चव्हाट्यावर आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी काही अधिका-यांना स्पर्धेतील महत्त्वाची जबाबदारी देण्याऐवजी इतर कामांमध्ये गुंतवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरुन संबंधित अधिका-यांनीही जे सांगितले तेव्हढेच करायचे, अशी भूमिका घेतली. नावंदे यांनी इतर अधिका-यांना विश्वासात न घेतल्यामुळे स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन चुकले. लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉलही पाळण्यात आला नाही़. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनीही कार्यक्रमातून काढता पाय घेतला. अधिका-यांबाबत नाराजी व्यक्त करीत जगताप निघून गेल्याचे सांगण्यात येते. माध्यमांना स्पर्धेबाबत माहिती कोणी सांगायची, यावरुन अधिका-यांमध्ये मतभेद आहेत. नावंदे यांना माहिती विचारली असता ते फोटोग्राफरचे नाव सांगतात. मात्र, अधिकारी कोण हे त्या सांगत नाहीत. त्यामुळे माध्यमांनाही वेळेत माहिती मिळत नाही. प्रशिक्षकांशी थेट संपर्क केला असता ते मीडिया सेलशी संपर्क साधण्यास सांगतात. मात्र, हा मीडिया सेल कोणी नियुक्त केला, त्याचे प्रमुख कोण हे कोणीही सांगत नाहीत. शुक्रवारी झालेल्या सामन्यांचा निकाल शनिवारी माध्यमांना पाठविला जातो़ तर शनिवारी सकाळी झालेल्या सामन्यांचा निकाल रात्री आठ वाजता वारंवार मागणी केल्यानंतर दिला जातो़. हा निकालही फोटोग्राफरकडून घ्या, असे जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे सांगतात. स्पर्धेचा निकाल फोटोग्राफरमार्फत देण्याची वेळ नावंदे यांच्यावर आली आहे, यावरुन त्या अधिका-यांवर किती विश्वास ठेवतात, अशीच चर्चा आहे. 
दरम्यान, शनिवारी महाराष्ट्राच्या मुले व मुली अशा दोन्ही संघांनी आगेकूच करीत उपांत्य सामन्यात धडक मारल्याचे सांगितले जाते. मात्र, जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सामन्यांचे निकाल माध्यमांना दिले गेले नाहीत. रात्री आठ वाजता जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, दीक्षित सर बोलतील, असा व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज पाठविला. त्यानंतर क्रीडा कार्यालयात फोन करुन विचारले असता असे कोणीही दीक्षित येथे नाहीत, असे सांगण्यात आले.
महाराष्ट्राची मध्यप्रदेशवर मात
साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या रोहन थूल याने एकेरीत मध्यप्रदेशच्या रिषभ राठोडवर मात करुन उपांत्य फेरीत धडक मारली. तर दुहेरीत शंतनू पवार-वेदांत काळे यांनी रिषभ राठोड-शिवंश गुर्जर या जोडीवर विजय मिळविला. त्यांची उपांत्यफेरीत निवड झाली. गुजरातच्या अधीप गुप्ता याने एकेरीत तामिळनाडूच्या ईश्वर एस याच्यावर तर दुहेरीत अधीप गुप्ता-सुजल गट्टा जोडीने तामिळनाडूच्या सारन कांथा व ईश्वर एस जोडीवर विजय मिळविला. कर्नाटकच्या बी़. एस. वैभव याने एकेरीत हरियानाच्या गौतम वालिया याच्यावर विजय मिळविला. त्यांची उपांत्यफेरीत निवड झाली.

Web Title: Badminton tournament 'game' by sports officials; Athlete of the player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.