प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:20 AM2021-03-07T04:20:17+5:302021-03-07T04:20:17+5:30

नेवासा : मुलीसोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून नेवासा येथील तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीच्या पित्यासह दहा जणांविरुद्ध ...

Attempt to kill a young man out of anger over a love marriage | प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न

Next

नेवासा : मुलीसोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून नेवासा येथील तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीच्या पित्यासह दहा जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळील वाहनांसह हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

नेवासा येथील बंटी उर्फ प्रशांत राजेंद्र वाघ याने व पाथर्डीतील ऋतुजा माणिक खेडकर यांनी १ मार्च रोजी आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहास मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे मुलीचे वडील माणिक खेडकर यांनी अनेकदा मुलीला सोबत पाठवा, अशी धमकी प्रशांत वाघला दिली होती.

शनिवारी दुपारी नेवासा शहरातील कडूगल्ली येथे वाघ यांच्या घरासमोर तीन ते चार चार चाकी वाहने आली. ही वाहने वाघ यांच्या घरासमोर वारंवार चकरा मारत होती. हा प्रकार प्रशांतची आई व भावाने पाहिले. यातील एका कारमधून मुलीचे वडील माणिक खेडकर, भाऊ ऋषीकेश खेडकर व एक अनोळखी इसम उतरले. यावेळी दरवाजासमोर असलेल्या प्रशांतवर एकाने गुप्तीचा वार केला. हा वार मोटारसायकलवर गेला. प्रशांत जीवाच्या आकांताने ओरडत घरात पळाला.

यावेळी माणिक खेडकर यांच्या भावाच्या हातात पिस्तूलसारखे हत्यार होते. ते त्यांनी प्रशांतच्या दिशेने रोखले होते. याशिवाय इतर कारमधून उतरलेल्या इसमांच्या हातात चाकू, लोखंडी रॉड, पिस्तूल, एअरगन होते. माणिक खेडकर हे ओरडून याला मारा सोडू नका, असे बोलत होते.

अचानक झालेल्या गोंधळामुळे गल्लीतील लोक जमा झाले. जमलेले लोक पाहून सर्वजण कारमध्ये बसून नेवासा फाट्याच्या दिशेने पळाले. प्रशांतने ताबडतोब पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनीही तत्परता दाखवत शेवगाव रस्त्यावरील भानसहिवरा शिवारात हॉटेल सावताजवळ आरोपींना पकडले. पोलिसांनी तीन गाड्यांसह प्रदीप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे, अमोल भीमराज कनोजे, शाहीद सय्यद, नारायण हरिभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे, सतीश भोसले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील हत्यारे जप्त केली. प्रशांत यांच्या पत्नीचे वडील माणिक कोंडिबा खेडकर, ऋषीकेश खेडकर, माणिक खेडकर यांचा भाऊ व एक अनोळखी इसम एका वाहनातून पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींविरुद्ध जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक विजय करे पुढील तपास करत आहेत.

---

०६ नेवासा क्राईम

नेवासा येथे तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेले शस्त्र.

Web Title: Attempt to kill a young man out of anger over a love marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.