श्रीरामपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच बाहेरील राज्यात आपापल्या घरी गेलेले कामगार पुन्हा परतू लागले आहेत. त्यामुळे उद्योगाची चाके पुन्हा गतिमान झाली आहेत. मात्र, हॉटेल व्यवसाय अजूनही पूर्वपदावर आलेला नाही. त्यामुळे ५० टक्के कामगार कामावर रुजू होऊ शकलेले नाहीत.
नगर जिल्ह्यात कोरोना संख्या नियंत्रणात आली आहे. प्रतिदिन तीन हजारांवर गेलेली रुग्णांची संख्या आता ५०० च्या घरात आली आहे. त्यामुळे घरी परतलेले परप्रांतीय कामगार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. एमआयडीसीतील उद्योगांची रुतलेली चाके फिरू लागली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारने उद्योगांना लॉकडाऊनमधून सूट दिलेली होती. मात्र, कामगारांअभावी उद्योगांना आर्थिक फटका बसला होता. आता पुन्हा शंभर टक्के उत्पादन क्षमता गाठण्यात यश आले आहे.
----------
हॉटेल व्यवसाय अस्थिर
हॉटेल व्यवसायांना अद्यापही नियंत्रणमुक्त करण्यात आलेले नाही. सायंकाळी चार नंतर केवळ पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली आहे. बैठक क्षमता अद्यापही कमी आहे. त्यामुळे केवळ ५० टक्के कामगारांची आवश्यकता असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली. उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल येथे कामगार त्यांच्या गावीच थांबलेले आहेत. ते शेतातील मजुरी कामांकडे वळले आहेत, अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली.
-----------
माझा ग्लास वर्कचा व्यवसाय आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कारागीर माझ्याकडे काम करतात. ते सर्व लोक लॉकडाऊननंतर कामावर हजर झाले आहेत. पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरू आहे.
- मारुती बिंगले, श्रीरामपूर.
---------
चायनीज खाद्यपदार्थ तयार करणारे कारागीर अजूनही हॉटेलमध्ये परतलेले नाहीत. त्यांना काम देण्यासाठी स्थिती नाही. सरकारने पूर्ण वेळ हॉटेल व्यवसाय चालविण्यास परवानगी द्यावी.
- अजय गुप्ता, हॉटेल चालक, श्रीरामपूर.
----------