शिक्षक बँकेतील घड्याळ घोटाळ्याची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:22 IST2021-05-26T04:22:27+5:302021-05-26T04:22:27+5:30
जागरुक सभासदांच्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधकांनी शिक्षक बँकेच्या घड्याळ व्यवहाराच्या चौकशीसाठी श्रीगोंदा येथील सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांची चौकशी अधिकारी ...

शिक्षक बँकेतील घड्याळ घोटाळ्याची चौकशी सुरू
जागरुक सभासदांच्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधकांनी शिक्षक बँकेच्या घड्याळ व्यवहाराच्या चौकशीसाठी श्रीगोंदा येथील सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली होती. चौकशी अधिकाऱ्यांसमोर वेळोवेळी झालेल्या सुनावणी दरम्यान बँकेच्या संचालक मंडळाने आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमताने अत्यंत नियोजनपूर्वक चुकीच्या पद्धतीने कसा व्यवहार केला, याचे तक्रारदारांनी सबळ पुराव्यानिशी संबंधित कागदपत्रे समोर ठेवून या व्यवहारातील अनियमितता आणि अपहाराचे न्यायिक पुरावे सादर केलेले होते. घड्याळ खरेदी व्यवहार अनियमितता आणि अपहारची चौकशी प्रक्रिया पूर्ण करून चौकशी अधिकारी खेडकर यांनी नुकताच अंतिम चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर केलेला होता.
या चौकशी अहवालात घड्याळ घोटाळा व्यवहारातील अनियमिततेवर ठपका ठेवत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ अंतर्गत चौकशी करण्याबाबत शिफारस केलेली होती. या अनुषंगाने अखेर जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी शिक्षक बँकेच्या घड्याळ घोटाळ्याच्या व्यवहाराची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम ८३ अंतर्गत चौकशी करून दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशी अहवालात १४ लाख १६०० रुपयांचे आर्थिक नुकसान बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने केलेले आहे, असे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. ही रक्कम मोठी असल्यामुळे बँकेची कलम ८३ अंतर्गत चौकशी करून जबाबदार संचालक मंडळाकडून वसुली करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही दुय्यम निबंधक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. पुढील चौकशी कामी ॲड. श्रीराम वाघ यांची सक्षम प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असल्याची माहिती शिक्षक परिषद आणि रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाउली मंडळाचे प्रवीण ठुबे, विकास डावखरे, गणेश वाघ, संतोष खामकर यांनी दिली आहे.
................
शिक्षक परिषद व गुरुमाउली मंडळाने केलेले घंटानाद आंदोलन त्याचप्रमाणे विकास डावखरे, गणेश वाघ, संतोष खामकर यांनी सातत्याने केलेल्या चिवट पाठपुराव्यामुळे बँकेची कलम ८३ ची चौकशी लागली आहे. चौकशी अधिकारी रावसाहेब खेडकर यांच्यापुढे जवळ जवळ एक वर्ष चौकशी प्रक्रिया चालली व यामध्ये संचालक मंडळास दोषी धरुन पुढील चौकशी करण्याबाबत आदेश दिला आहे.
- प्रवीण ठुबे, जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद.