‘शंकररावांचा पिंड समाजकारणाचाच’
By Admin | Updated: July 20, 2014 00:22 IST2014-07-19T23:39:59+5:302014-07-20T00:22:59+5:30
कोपरगाव : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्व़ शंकरराव काळे यांनी उच्च शिक्षण घेतले़ त्यांचा पिंड समाजकारणाचाच होता़ राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यात त्यांनी दिलेले योगदान
‘शंकररावांचा पिंड समाजकारणाचाच’
कोपरगाव : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्व़ शंकरराव काळे यांनी उच्च शिक्षण घेतले़ त्यांचा पिंड समाजकारणाचाच होता़ राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यात त्यांनी दिलेले योगदान जीवन दर्शन संग्रहालयातून दिसून येते़ हे संग्रहालय नव्या पिढीसाठी स्फूर्तीदायक ठरेल, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले़
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मृती उद्यान प्रकल्पाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले़ त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, तर प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री जितेंद्र आव्हाड, आ़ चंद्रशेखर घुले, यशवंतराव गडाख, पांडुरंग अभंग, दादाभाऊ कळमकर, अप्पासाहेब राजळे, बी़जे़ खताळ, प्रसाद तनपुरे, जयंत ससाणे, शिवाजीराव नागवडे, खा़ सदाशिव लोखंडे, अॅड़ रावसाहेब शिंदे, पी़ बी़ कडू, जितेंद्र आव्हाड, नरेंद्र घुले, विठ्ठलराव लंघे, अनिल शिंदे, बिपीन कोल्हे, प्रताप ढाकणे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते़
पवार म्हणाले की, शंकरराव काळे यांचे जीवन दर्शन घडविणारे संग्रहालय अतिशय देखणे आहे़ यातील कलाकृती रेखीव आहेत़ काळे यांनी शिक्षण क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले़ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सानिध्यात राहून त्यांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात आणली़ आ़ अशोक काळे आणि आशुतोष काळे यांनी हे स्मृती उद्यान उभारून कै़ काळे यांचे जीवन दर्शन नव्या पिढीला घडविले ही चांगली बाब आहे़
शंकरराव काळे असो की शंकरराव कोल्हे यांचा पाण्यासाठी संघर्ष सतत सुरू असे़ कोणत्याही कार्यक्रमात भेट झाली की, पाणी प्रश्न निघाल्याशिवाय राहत नसे, असे सांगून पवार म्हणाले की, काळे यांचा शेतकरी कामगार पक्षापासून यशवंतराव चव्हाण यांच्या सानिध्यात आल्यानंतर काँग्रेस प्रवेश, जिल्हा परिषद अध्यक्ष, पारनेरचे आमदार, मंत्री, रयत शिक्षण संस्थेतील योगदानाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला़
स्मृती उद्यानाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविल्याबद्दल आशुतोष काळे यांचे विशेष कौतूक करून महसूलमंत्री थोरात म्हणाले, या स्मृती उद्यानामुळे काळे साहेबांचे काम दीपस्तंभाप्रमाणे समाजापुढे राहणार आहे़
या स्मृती उद्याणाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्तेच व्हावे, अशी आमची सर्वांची इच्छा होती, असे सांगून आ़ अशोक काळे यांनीही पवारांसमोर पाणी प्रश्नाचे गांभीर्य मांडले़ कोपरगाव तालुक्यातील दोन साखर कारखाने शासनाला हजारो कोटींचा कर उत्पादन शुल्काच्या माध्यमातून देतात़ त्यातूनच काही रक्कम तालुक्याच्या पाटपाण्यासाठी खर्च करावी व आम्हाला पाणी द्यावे, अशी मागणी केली़
प्रास्ताविक आशुतोष काळे यांनी केले़ काळे यांच्या अमेरिकास्थित कन्या स्नेहल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले़ आ़ काळे यांच्या कन्या मेघना देशमुख यांनी कवितेचे वाचन केले़ पवार व मान्यवरांच्या हस्ते ‘विकास सूर्य’ या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले़ सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले. खा़ सदाशिव लोखंडे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)
शंकरराव कोल्हे म्हणाले की, काळे आणि माझे राजकीय भांडण काही मुद्यांवर होत असे़ परंतु विकासाच्या, पाटपाण्याच्या आणि सहकारी संस्थांच्याबाबत आम्ही एकत्र निर्णय घेत होतो़ इंग्रजांनी या भागाला पाणी दिले़ परंतु आज येथील पाणी पळविले जात आहे़ आमच्या भागातील शेतीसाठी असलेल्या धरणांवर बिगर सिंचनाचे आरक्षण मोठ्या प्रमाणात आहे़ त्यात इंडियाबुल्स कंपनीला तीन टिएमसी पाणी दिल्यास हा भाग उजाड होईल. त्यामुळे पवारांनी या प्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणीही कोल्हे यांनी केली़