ग्रामीण भागही मधुमेहाच्या विळख्यात
By Admin | Updated: July 14, 2014 00:58 IST2014-07-14T00:36:03+5:302014-07-14T00:58:51+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील १८ वर्षापुढील नागरिकांची मधुमेहाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

ग्रामीण भागही मधुमेहाच्या विळख्यात
अहमदनगर : जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील १८ वर्षापुढील नागरिकांची मधुमेहाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. यानुसार नगर आणि पारनेर तालुक्यात २७ गावात झालेल्या तपासणीत १४९४ रुग्णांपैकी ४०६ जण मधुमेहग्रस्त असल्याचे आढळून आलेले आहे. श्रीमंताचा आजार म्हणून ओळख असणारा हा आजार आता गरिबांच्याही मागे लागला असल्याने विशेष काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या पुढाकारातून पुण्याच्या चेलाराम डायबिटीक इन्स्टिट्यूटची ही मोफत तपासणी करत आहे. नवाल यांनी जिल्ह्यात अनेक नाविण्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १८ वर्षापुढील नागरिकांची मधुमेहाची चाचणी करण्यात येणार असून तपासणीनंतर मधुमेहग्रस्तांना संबंधित संस्थाकडून १५ दिवसांची मोफत औषध देण्यात येत आहेत.
मधुमेहाची निश्चित कारणे नसली तरी अनुवंशिक, बदललेली जीवनशैली, आहारातील अनियमितता यामुळे मधुमेहाचा धोका वाढलेला आहे. मधुमेह हा असा विकार आहे की तो शरिरात वर्षानुवर्ष लपून राहतो आणि संधी मिळताच त्याचे रूद्र रु प धारण करतो. विशेष म्हणजे मधुमेहामुळे शरिराचा कोणताही अवयव निकामा होईल, हे निश्चित सांगता येत नसल्याने, या आजारग्रस्तांची विशेष काळजी आवश्यक आहे.
ग्रामीण भागात या आजाराचे निदान करणे, औषधोपचार करणे आणि काळजी घेण्याची साधने नसल्याने यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. चेलाराम डायबिटीक इन्स्टिटयूटच्या वतीने संस्थेचा अद्ययावत, यंत्र सामुग्रीचा फिरता दवाखाना आहे. तो प्रत्येक गावात जात असून त्याठिकाणी २ नर्स, एक वैद्यकीय अधिकारी आणि सोबत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तपासणी मोहिमेत सहभागी होत आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून नगर तालुक्यापासून या तपासणीला सुरूवात झाली. तालुक्यातील १३ गावात झालेल्या तपासणीत ८२० लोकांमध्ये २०५ जुने तर १९ नवीन आणि पारनेर तालुक्यातील १४ गावातील ६७४ पैकी १६० जुने आणि २२ नवीन मधुमेहाचे रुग्ण आढळलेले आहेत.
या दोन तालुक्यात नगर तालुक्यात २२४ तर पारनेर तालुक्यात १८२ मधुमेहग्र्रस्त आढळलेले आहे. वेळीच मधुमेहाचा विळखा रोखण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. टप्प्या टप्प्याने ही मोहीम जिल्हाभर राबविण्यात येणार असून यात मधुमेहाचे नवीन आणि जुने अशा दोन्ही रुग्णांची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
मधुमेह टाळण्यासाठी वजन, आहार नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने तणावमुक्त राहणे गरजेचे असून ज्यांच्या घरात मधुमेह अनुवंशिक आहे त्यांनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने वयाच्या चाळिशीनंतर मधुमेहाची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद टप्प्या टप्प्याने पूर्ण जिल्ह्यात मधुमेहाची तपासणी करणार आहेत्न
-डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद.