फेब्रुवारी २०१८ मध्ये फोनवरील संभाषणादरम्यान छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छिंदम याच्याविरोधात कलम २९५ व १५३ प्रमाणे तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा प्रथम तत्कालीन सहायक निरीक्षक प्रकाश पाटील यांनी तपास केला होता. पाटील यांची बदली झाल्याने सहायक निरीक्षक किरण सुरसे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. गुन्हा दाखल झाला तेव्हा छिंदम हा महापालिकेत उपमहापौर पदावर कार्यरत होता. शासकीय लोकसेवक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी गृहविभागाची परवानगी घ्यावी लागते. याबाबत तपासी अधिकारी सुरसे यांनी गृहविभागात पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. त्यानंतर गृहविभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांच्यासह सर्व समिती सदस्यांची स्वक्षरी झाल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी मिळाली आहे.
-----------------------
छिंदमविरोधात उसळला होता जनक्षोभ
फेब्रुवारी २०१८ मध्ये महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी फोनवरून बोलताना छिंदम याने उर्मट भाषा वापरून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. छिंदमची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगरसह राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या घटनेनंतर छिंदमला उपमहापौर पदावरून बडतर्फ करण्यात आले होते, तसेच भाजपनेही त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती.
-------------------
दोन दिवसांपूर्वीच छिंदमविरोधात गुन्हा
टपरीचालकाला शिवीगाळ करत पैसे हिसकाविल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ व इतर ४० जणांविरोधात दोन दिवसांपूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरी व ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.