नागापूरला लवकरच महापालिकेचे उपकेंद्र
By Admin | Updated: September 20, 2014 23:21 IST2014-09-20T23:11:51+5:302014-09-20T23:21:56+5:30
अहमदनगर: नागापूर येथे महापालिकेचे आरोग्य उपकेंद्र लवकरच स्वत:च्या जागेत सुरू होणार आहे.

नागापूरला लवकरच महापालिकेचे उपकेंद्र
अहमदनगर: नागापूर येथे महापालिकेचे आरोग्य उपकेंद्र लवकरच स्वत:च्या जागेत सुरू होणार आहे. उपकेंद्रासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जागा हस्तांतरण केली जाणार आहे. या उपकेंद्राच्या उभारणीमुळे नागापूर-बोल्हेगाव उपनगरातील नागरिेकांची सोय होणार आहे.
सावेडी भागात महापालिकेचे आरोग्य उपकेंद्रच नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी शहरात यावे लागत असे. नागापूर येथे भाडोत्री खोलीत महापालिका या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देत आहे. देहरे उपकेंद्रांतर्गत नागापूर येथे जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आहे. नागापूर महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर नेप्ती येथे या केंद्राचे स्थलांतर करण्यात आले. नागापूरपासून जवळच नवनागापूर येथे जिल्हा परिषदेच्यावतीने आरोग्य सेवा सुरू आहे. नागापूर येथील केंद्र स्थलांतर झाल्याने ही जागा विनावापर पडून होती. ही जागा ताब्यात मिळावी असा प्रस्ताव महापालिकेने जिल्हा परिषदेला दिला. या प्रस्तावास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. मात्र या जागेची मालकी जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याने जागा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हस्तांतरण केली जाणार आहे. तसे जिल्हा परिषदेने महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयास कळविले आहे. ही जागा महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर महापालिकेचे उपकेंद्र सुरू होईल. उपकेंद्र सुरू झाल्यामुळे नागापूर-बोल्हेगाव भागातील नागरिकांनी मोठी सोय होणार आहे. (प्रतिनिधी)