अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजारपेठा मंगळवारी बंद होत्या. उघड्या असलेल्या दुकानांचे शटर डाऊन करण्यासाठी पोलीस, स्थानिक प्रशासनाने आवाहन केले. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाविरुद्ध व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाच दिवस दुकान चालू ठेवण्याची मागणी केली. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी बाजारपेठा, दुकाने बंद होती. मात्र, रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर सुरू होती.
राज्य सरकारने घोषित केलेला लॉकडाऊन आणि त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे दुकानदार, व्यापारी यांनी स्वत:हून दुकाने उघडलीच नाहीत. काही दुकाने सुरूच होती. पोलीस, स्थानिक प्रशासनाने शहरभर फिरून बंद करण्याचे आवाहन केले. कापड बाजारातील मोची गल्ली येथील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आदेशाविरुद्ध निदर्शने केली. कापड बाजार असोसिएशनने सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आठवड्यातील पाच दिवस दुकाने चालू ठेवण्याची मागणी केली.
दरम्यान, दुकाने, बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती. अत्यावश्यक सर्व सेवा सुरू होत्या.