वेळ आल्यास लोकसभा लढवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:24+5:302021-07-17T04:18:24+5:30
अहमदनगर : आधी पारनेर तालुक्यातील काही नेते मला विरोधक मानून टीका करीत होते. आता माझ्या कामामुळे जिल्ह्यातील काही जणांना ...

वेळ आल्यास लोकसभा लढवू
अहमदनगर : आधी पारनेर तालुक्यातील काही नेते मला विरोधक मानून टीका करीत होते. आता माझ्या कामामुळे जिल्ह्यातील काही जणांना मी विरोधक वाटू लागल्याने तेही टीका करू लागले आहेत. त्यांच्या टीकेकडे मी फारसे लक्ष देत नाही. मात्र, वेळ आल्यास लोकसभेची निवडणूकही आपण सक्षमपणे लढण्यास तयार आहोत, अशा शब्दांत नगर-पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला. पारनेर तालुक्यातील पळशी येथील एका कार्यक्रमात लंके बोलत होते. लंके म्हणाले, माझ्याकडे कोणत्याही संस्था नाहीत. कारखाने नाहीत. हॉस्पिटल नाही. माझ्याकडे फक्त जिवाभावाची माणसे आहेत. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरीही मी घाबरत नाही. आमच्या कोविड सेंटरवर टीका करणाऱ्यांनी येथील काम पाहावे. आतापर्यंत या कोविड सेंटरमधून १७ हजार रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. यातून लोकांचे १८५ कोटी रुपये वाचले आहेत, असेही लंके म्हणाले.
.............
त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे मोफत उपचार घेतले
आपण जिवाला घाबरत नाही. त्यामुळेच कोविड सेंटरच्या माध्यमातून लोकांची सेवा करू शकलो. आज जे माझ्यावर आणि कोविड सेंटरवर टीका करीत आहेत, त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांवरही आमच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्याची वेळ आली. विळद घाटातील त्यांच्या संस्थेत नोकरीला असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली. तेव्हा तेथील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करून घेताना अनामत रक्कम मागितली गेली. त्यामुळे ते आमच्या सेंटरला आले आणि मोफत उपचार घेऊन गेले, असे लंके यांनी सांगितले.