पाचेगावात बिबट्याचे हल्ले सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:06 IST2021-01-08T05:06:20+5:302021-01-08T05:06:20+5:30
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे बिबट्याच्या पशुधनावर हल्ले सुरूच असून बिबट्यांना पकडण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे ...

पाचेगावात बिबट्याचे हल्ले सुरूच
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे बिबट्याच्या पशुधनावर हल्ले सुरूच असून बिबट्यांना पकडण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
येथील कैलास काशीनाथ पवार यांच्या वस्तीवर बिबट्याने शुक्रवारी मध्यरात्री एका बोकडवर हल्ला केला. या हल्ल्यात हा बोकड जागीच ठार झाला. गत गुरुवारी कारवाडी येथील धोंडीराम राक्षे यांच्या वस्तीवर बिबट्याने एका शेळीला ठार करत एका बोकडास जखमी केले होते.
शुक्रवारी मध्यरात्री कैलास पवार यांच्या खिर्डी शिवेलगत असणाऱ्या सर्व्हे क्रमांक २६८ मध्ये ही घटना घडली. वेगवेगळ्या ठिकाणी या दोन्ही घटना घडल्याने परिसरात बिबट्यांची संख्या अधिक असण्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दोन्ही ठिकाणी अनेक कुटुंबे शेतात वस्त्या करून राहतात. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पाचेगाव परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. यात अनेक पशुधनाचा बळी जात आहे. या परिसरात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
शेतातील कामे करताना गावातील अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडत आहे. वनविभागाने बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेऊन कारवाडी येथे तातडीने पिंजरा लावला आहे. दोन्ही घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडू नये तसेच पशुधन सुरक्षित ठिकाणी बंदिस्त करावे, असे आवाहन वनाधिकारी मुश्ताक सय्यद यांनी केले. यावेळी वनविभागाचे बी. बी. पाठक, शेतकरी रवींद्र तुवर, धनंजय पवार, संतोष गाडेकर, धोंडीराम राक्षे, कैलास पवार, अमोल जेजूरकर, सागर तुवर आदी हजर होते.