दिवसेंदिवस कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत असल्याने अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण रस्त्यावर फिरू नका, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहेत. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांशी नागरिक नियमांचे पालन करत आहेत. काही हुल्लडबाज मात्र नियमांचे उल्लंघन करत विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर फिरताना पोलिसांना आढळून येत आहेत. तोफखाना पोलिसांनी गस्तीदरम्यान रविवारी सायंकाळी विनाकारण फिरणाऱ्या आठ जणांना वाहनासह ताब्यात घेतले. तसेच सोमवारी सकाळीही आठ जणांना वाहनांसह ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांना काही वेळ पोलीस ठाण्यात बसवून कोरोनाचा संसर्ग किती घातक आहे, आपल्यापासून कुटुंबीयांना व इतरांना कसा धोका संभवू शकतो, त्यामुळे घरात बसूनच स्वतःची कशी काळजी घ्यावी, अशी पोलिसांनी या रिकामटेकड्यांची कानउघडणी केली. त्यानंतर सर्व जणांना दंड करून सोडून देण्यात आले. वाहतूक शाखा व कोतवाली पोलिसांनीही विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.
.............
चौकाचौकात हुल्लडबाजांचे टोळके
नगर शहरात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने विनाकारण फिरणारे जास्त कुणी दिसत नाहीत. उपनगरात मात्र हुल्लडबाज तरुणांचे टोळके सायंकाळी सहानंतर चौकाचौकात उभे असलेले दिसतात. विशेष म्हणजे बहुतांश जणांनी मास्कही घातलेले नसतात. सायंकाळी सहा नंतर पोलिसांनी सावेडी उपनगर, निर्मलनगर व तपोवन रोड परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
.........
एकविरा चौकात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अत्यावश्यक सेवांना सकाळी सात ते अकरा या वेळेतच परवानगी आहे तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी एका जागेवर बसून विक्री न करता घरोघरी जाऊन विक्री करावी असे प्रशासनाचे आदेश आहेत. एकविरा चौक ते कोहिनूर मंगल कार्यालय पर्यंत भाजीपाला विक्रेते दररोज दुकान मांडून बसतात. याठिकाणी ग्राहक भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसतात. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना कोणीच दिसत नाही.
---
फोटो- १९ पोलीस कारवाई
नगर शहरातील डीएसपी चौकात शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना समज देऊन दंडात्मक कारवाई केली. यावेळी पोलिसांनी तरुणांचे प्रबोधनही केले.