राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल या विद्यालयातील शिक्षकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकरिता शासनातर्फे हरभरा, मसूरदाळ हे धान्य वितरणासाठी आले होते. शाळेतील काही विद्यार्थी लॉकडाऊनमुळे बाहेरगावी राहण्यास गेलेले आहेत. सध्या ‘ब्रेक द चेन’मुळे जिल्हा प्रवेशबंदी असल्याने पालकांना धान्य घेऊन जाण्यात अडचणी येत होत्या. त्यावर शाळेने सदर विद्यार्थ्यांचे धान्य विद्यार्थ्यांचा गावी घरपोहोच देण्याचे नियोजन केले. या लॉकडाऊन काळामध्ये गोरगरीब पालकांना धान्य दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. या उपक्रमास मनपाचे प्रशासनाधिकारी पवार यांनी प्रोत्साहन देऊन धान्य घरपोहोच करण्यास परवानगी दिली. मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे, बाबासाहेब लोंढे, सतीश काळे, संजय सकट, रामनाथ घनवट, आबासाहेब बेडके, कविराज बोटे, प्रवीण उकिरडे व सर्व शिक्षक यांनी सामाजिक अंतर राखून गटाने नगर, पाथर्डी, शेवगाव, बीड, गेवराई, शिरूर कासार या तालुक्यातील विविध गावांमध्ये विद्यार्थ्यांना घरपोच धान्य दिले.
फोटो - 25 राष्ट्रीय पाठशाळा
पाथर्डी तालुक्यातील तांड्यामधील विद्यार्थ्यांना धान्यवाटप करताना मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे. समवेत बाबासाहेब लोंढे, सतीश काळे, संजय सकट, रामनाथ घनवट, आबासाहेब बेडके, कविराज बोटे, प्रवीण उकिरडे आदी.