कोरोना रुग्णांसाठी श्रीगोंद्यात सरसावले मदतीचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:41+5:302021-04-19T04:18:41+5:30
तालुक्यातील कोळगाव, घारगाव येथे पहिले कोविड सेंटर सुरू झाले आहे. पिंपळगाव पिसा, बेलवंडी, लोणीव्यंकनाथ येथे सर्व सुविधा ...

कोरोना रुग्णांसाठी श्रीगोंद्यात सरसावले मदतीचे हात
तालुक्यातील कोळगाव, घारगाव येथे पहिले कोविड सेंटर सुरू झाले आहे. पिंपळगाव पिसा, बेलवंडी, लोणीव्यंकनाथ येथे सर्व सुविधा असलेली कोविड केअर सेंटर सुरू होत आहेत. येत्या आठवड्यात १५ ते २० गावात कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू होणार आहेत.
श्रीगोंद्यात सुरुवातीला शासकीय एकच कोविड हेल्थ केअर सेंटर होते. त्यामध्ये कमालीचा यंत्रणेवर ताण आला. होम क्वॉरंटाईन रुग्णांची संख्या वाढू लागली. होम क्वॉरंटाईन रुग्ण आणि त्यांच्यापासून इतरांना होणारी बाधा विचारात घेऊन ग्रामीण भागातील डाॅक्टरांनी जनजागृती करून कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीचे हात पुढे आले आहेत.
त्यामुळे अनेक कोविड बाधित रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
कोळगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील कोविड केअर सेंटर व घारगाव येथील शिवशंभो कोविड केअर सेंटरचे प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
माजी आमदार राहुल जगताप यांच्या पुढाकाराने पिंपळगाव पिसा येथे बाळासाहेब नाहाटा यांच्या पुढाकारातून सुरू होत असलेल्या कोविड सेंटरचे सोमवारी उद्घाटन होत आहे. घारगाव येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी संगीता खामकर, रमेश खोमणे, भूषण बडवे, अविनाश निंभोरे, हंबीर पवार, धनंजय पवार, डॉ. चंद्रशेखर कळमकर, डॉ. विनायक शिंदे उपस्थित होते.
..............
जगतापांची ऑक्सिजन सिस्टीम
श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड कमी पडू लागले आहेत. माजी आमदार राहुल जगताप यांनी ग्रामीण रुग्णालयात १५ ऑक्सिजनबेडची सिस्टीम बसवून देण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्याकडे दोन लाखांची मदत दिली आहे.
स्थानिक डॉक्टर आरोग्यदूताच्या भूमिकेत
माणुसकीची पताका खांद्यावर घेऊन ग्रामस्थांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. या कोविड केअर सेंटरमध्ये विनामूल्य सेवा करून आरोग्यदूतांची भूमिका करणार आहेत.
....................
अंगणवाडी सेविकेने दिला एक महिन्याचा पगार
घारगाव येथील शिवशंभो कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करण्यासाठी अंगणवाडी सेविका शोभा अनिल मोळक यांनी एक महिन्याचा पगार मदत म्हणून दिला आहे.
.......
फोटो - कोळगाव
कोळगाव येथील कोविड सेंटरचे उद्घाटन करताना प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार आदी दिसत आहेत.