चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन दिवसांपासून जुळवाजुळव करण्यात धडपडत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रयत्नांना अखेरच्या टप्प्यात अपक्ष इच्छुक उमेदवारांच्या नाराजीमुळे अपयश आले. सर्व पॅनलप्रमुख व चालकांची मनधरणी करत परस्परांचे मनोमिलन करण्यात पूर्णपणे यशस्वी ठरलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अपक्ष उमेदवारांची मोट बांधणे शक्य झाले नाही.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायत मोठी आहे. राजकीयदृष्ट्याही तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील नेत्यांचे याकडे बारकाईने लक्ष राहते; परंतु, गावाच्या भल्यासाठी एकी हवी या उद्देशातून सेवानिवृत्त वन अधिकारी किसन आगलावे व त्यांचे ज्येष्ठ नागरिक सहकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच बिनविरोधच्या दृष्टीने प्रयत्नशील होते. त्यासाठी सातत्याने बैठका सुरू होत्या. तीन जानेवारीला सात तास चाललेल्या बैठकीत गावातील प्रमुख गावपुढऱ्यांना एकत्र करत त्यांना समजावून सांगितल्यावर सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत बिनविरोधची तयारी दर्शविली. तडजोडी करून मिळेल त्या प्रमाणात जागा स्वीकारल्या व मनाचा मोठेपणा दाखवला. ग्रामपंचायत बिनविरोध होणार याची संपूर्ण गावभर वार्ता पसरताच ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी गर्दी करत आनंद व्यक्त केला.
मात्र, चर्चेत अपक्षांना समाविष्ट न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करीत यास विरोध करत उमेदवारी मागे घेण्यास असमर्थता दाखवत फोन बंद करून बाहेरगावी निघून गेले. परिणामी, निवडणूक अटळ झाली आहे.