अहमदनगर : कोरोना लसीकरण मोहिमेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या टप्प्यात मागवलेले १ लाख ३९ हजार डोस आता संपले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने आणखी ३ लाख डोसची मागणी सिरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेककडे केली आहे.
नगरसह राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. पहिल्या टप्प्यात १३ जानेवारी ते २ मार्चपर्यंत एकूण १ लाख ३९ हजार ३५० डोस नगर जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यातून प्राधान्याने खासगी व शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करायचे होते. त्यासाठी ३७ हजार ३२८ कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील १४ हजार ३९१ जणांना पहिला, तर १० हजार ३८५ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यानंतर महसूल, पोलीस, पंचायत राज, गृह व शहरी कामकाज, रेल्वे सुरक्षा बद आदी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. जिल्हा परिषदेकडे असलेल्या संपूर्ण १ लाख ३९ हजार डोसचे वाटप खासगी व शासकीय रुग्णालयांना करण्यात आले आहे. आता आणखी ३ लाख डोसची मागणी शासनाकडे करण्यात आली असून दोन दिवसांत हे डोस प्राप्त होतील, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
-----------
कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा समावेश
आतापर्यंत नगरसाठी एकूण १ लाख ३९ हजार ३५० डोस प्राप्त झाले. त्यात १९ हजार २६० डोस भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीचे, तर उर्वरित १ लाख २० हजार ९० डोस सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीचे होते.
----------
यांनी घेतली लस
आरोग्य कर्मचारी - १४३९१
महसूल कर्मचारी ११३८
पोलीस - २८८४
पंचायत राजचे कर्मचारी - २८३५
गृह व शहरी कामकाज कर्मचारी - १४५६
रेल्वे सुरक्षा बलचे कर्मचारी - २३३
------------
११ हजार जणांचा दुसरा डोस
यात आरोग्य विभागाचे १० हजार ३२५, महसूलचे १७, पोलीस ३६, गृह कामकाजचे ४८, तर ज्येष्ठ नागरिक ५१२ अशा एकूण १० हजार ९९८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
----------
एकूण १२० केंद्रांत लसीकरण
सध्या जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रूग्णालये, ११ ग्रामीण रुग्णालये, ८ महापालिका रुग्णालये, तसेच ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण १२० केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांत सोमवार, बुधवार व शुक्रवार, तर इतर केंद्रांवर रविवार वगळता सर्व दिवस लसीकरण सुरू राहणार आहे.
----------
खासगी दवाखान्यात ८ हजार नोंदणी
गेल्या चार दिवसांत जिल्ह्यातील ३३ खासगी रुग्णालयात ७ हजार ९७७ नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली असून त्यातील साडेसहा हजार जणांनी लस घेतली आहे. खासगी रुग्णालयात लस २५० रुपयांना आहे.
-------------
फोटो - ०८व्हॅक्सिन