पिस्तुलासह दोघांना अटक
By Admin | Updated: September 20, 2014 23:21 IST2014-09-20T23:07:49+5:302014-09-20T23:21:09+5:30
अहमदनगर: भेंडा (ता. नेवासा) येथे एक जिवंत काडतुसासह एका पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पिस्तुलासह दोघांना अटक
अहमदनगर: भेंडा (ता. नेवासा) येथे एक जिवंत काडतुसासह एका पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोघांनी श्रीरामपूर येथून दुचाकी चोरून आणल्याचीही त्यांनी कबुली दिली असून त्यांच्याकडून आणखी काही बेकायदा शस्त्राच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना भेंडा येथे दोन इसम गावठी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे आणि संजय पाटील यांनी भेंडा येथे सापळा रचला. भेंडा येथील जिजामाता विद्यालयाच्या मैदानाजवळ दोन इसम संशयितरित्या फिरताना त्यांना आढळून आले. अंगझडती घेतली असला एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगेझिनमध्ये एक राऊंड आढळून आला. त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर मच्छिंद्र धनवडे (वय २०) आणि ज्ञानदेव तात्यासाहेब धनवडे (वय २०, दोघे रा. भेंडा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी श्रीरामपूरमधून एक दुचाकी चोरली असून त्यावरूनच ते प्रवास करीत होते. त्यांच्याकडे आणखी गावठी कट्टे विक्रीसाठी असण्याची शक्यता असून एखादी टोळी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे हेड पोलीस कॉन्स्टेबल मधुकर शिंदे, राकेश खेडकर, योगेश गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र गायकवाड, शैलेश गोमसाळे, सचिन मीरपगर, ज्ञानदेव गव्हाणे, विनोद मासाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.