जून महिन्याच्या मोफत धान्यापासून लाभार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:00+5:302021-07-18T04:16:00+5:30
कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांना कुटुंब चालविण्यासाठी हातभार लागावा म्हणून शासनाने मोफत धान्य वितरण सुरू केले. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर मोफत ...

जून महिन्याच्या मोफत धान्यापासून लाभार्थी वंचित
कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांना कुटुंब चालविण्यासाठी हातभार लागावा म्हणून शासनाने मोफत धान्य वितरण सुरू केले. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर मोफत धान्य वितरण बंद करण्यात आले होते. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्यानंतर शासनाने मागील तीन महिन्यांपासून पुन्हा मोफत धान्य वितरण योजना सुरू केली. पहिल्या दोन महिन्यांचे रेशन लाभार्थींना वेळेत मिळाले. जून महिन्याचे मोफत धान्य पुरवठा विभागाकडून संबंधित रेशन चालकांच्या दुकानात येऊन पडले आहे. मात्र, जुलै महिना निम्मा संपलेला असतानाही अद्यापही हे हक्काचे धान्य रेशनधारकांना मिळाले नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही ओसरला नसल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह हातावर चालवत आहेत. त्यातच शाळा, वसतिगृहे बंद असल्याने आदिवासी भागात सर्व कुटुंबच घरी बसून आहे. अशा परिस्थितीत मिळणाऱ्या मोफत हक्काच्या धान्यापासून हे लाभार्थी अद्यापही वंचित आहेत. वाटपाचा डाटा उपलब्ध नसल्याचे कारण दुकानदार पुढे करत टाळाटाळ करत आहेत. हक्काचे मोफत रेशन धान्य केव्हा मिळणार, असा सवाल लाभार्थींमधून व्यक्त होत आहे.
...................
तर दुकानांचे टाळे तोडू
रेशन धान्य दुकानांत जून महिन्याचे मोफत धान्य येऊन पंधरा दिवस झाले. मात्र, लाभार्थींना गरज असतानाही या धान्याचे वितरण झालेले नाही. दोन दिवसांत वाटप सुरू झाले नाही तर त्यानंतर आदिवासी सरपंच पेसा परिषदेचे सरपंच लाभार्थींसमवेत दुकानांचे टाळे तोडून हे वितरण करतील. त्यास पुरवठा विभाग जबाबदार राहील, असा इशारा सरपंच परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत गोंदके यांनी दिला आहे.