अनेक शाळांवर बंदचे गंडांतर
By Admin | Updated: July 11, 2014 00:56 IST2014-07-11T00:33:26+5:302014-07-11T00:56:24+5:30
श्रीगोंदा : गुगल मॅपिंगव्दारे झालेल्या सर्व्हेनुसार तालुक्यातील लोणीव्यंकनाथ शिवारातील भनळीची आठ विद्यार्थी असलेली शाळा बंद करण्यात येणार आहे.

अनेक शाळांवर बंदचे गंडांतर
श्रीगोंदा : गुगल मॅपिंगव्दारे झालेल्या सर्व्हेनुसार तालुक्यातील लोणीव्यंकनाथ शिवारातील भनळीची आठ विद्यार्थी असलेली शाळा बंद करण्यात येणार आहे. तसेच दहापेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या अनेक शाळांवर बंदची टांगती तलवार आहे.
गुगल मॅपिंगच्या सर्व्हेनुसार ज्या दोन प्राथमिक शाळांमधील हवाई अंतर एक कि. मी. किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा दोन शाळांपैकी वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेली एक प्राथमिक शाळा बंद करण्यात येणार आहे. पुणे येथे आयोजित शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत शिक्षण आयुक्त एस. पोकलिंगम यांनी या सर्व्हेनुसार जिल्हा शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार गाव व तालुकानिहाय दोन प्राथमिक शाळांमधील हवाई अंतर मोजणे, कोणती शाळा बंद करावी, नजीकच्या अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करावे, याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
या सर्व्हेनुसार वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या काही शाळा बंद झाल्यानंतर उर्वरित शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढणार आहे. यामध्ये मोठ्या शाळांचा गुणात्मक, भौगोलिक दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.
सर्व्हेनुसार लोणीव्यंकनाथ शिवारातील भनळीची शाळा बंद करुन या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पारगाव शिवारातील खेतमाळीस मळा शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी दिल्या आहेत.
वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळा बंद झाल्यास ग्रामीण भागातील शाळांवर गंडांतर येऊन त्या मोठ्या प्रमाणावर बंद पडण्याची भीती आहे. विद्यार्थ्यांचे मोठ्या शाळांमध्ये समायोजन करताना विद्यार्थ्यांची येण्या, जाण्याची सुविधा न केल्यास अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहाण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)
७७ शाळांमध्ये कमी मुले
श्रीगोंदा तालुक्यातील ३७२ प्राथमिक शाळांपैकी ७७ शाळांची वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थी असलेली अलभरमळा (देवदैठण) शून्य विद्यार्थी, भांबवाडी (पिंप्रीकोलंदर) ६, कोळपेमळा (बोरी) ८, वडाची वस्ती (चिखली), विधातेवस्ती (हंगेवाडी), टेमगिरी मळा (राजापूर) या शाळांची विद्यार्थी संख्या दहा आहे. या शाळांवर बंदची टांगती तलवार आहे.