लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिकेत स्थायी समिती सदस्यपदावरून पुन्हा राजकीय धुरळा उडण्याची चिन्हे आहेत. स्थायी समितीचे आठ सदस्य सोमवारी निवृत्त होत असून, त्यांच्या जागी नव्याने सदस्यांची निवड करण्यासाठी इच्छुकांचा दबाव वाढला आहे. त्यामुळे महापौर बाबासाहेब वाकळे याबाबत काय भूमिका घेतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
महापालिका स्थायी समितीचे गणेश भोसले, कुमार वाकळे, सुवर्णा जाधव, मुदस्सर शेख, सोनाली चितळे, योगीराज गाडे, आशा कराळे, सुभाष लोंढे हे आठ सदस्य सोमवारी निवृत्त होत आहेत. स्थायी समितीत एकूण १६ सदस्य असतात. एक वर्षाने आठ सदस्य साेडतीद्वारे निवृत्त होत आहेत. उर्वरित आठ सदस्यांची मुदत दोन वर्षे आहे. वरील आठ सदस्यांच्या नावाची चिठ्ठी न निघाल्याने ते दोन वर्षे सदस्य राहिले. त्यांची दोन वर्षांची मुदत येत्या १ फेब्रुवारीला संपुष्टात येईल. त्यामुळे स्थायी समितीच्या आठ जागा रिक्त होतील. महासभा घेऊन नवीन आठ सदस्यांची निवड करावी, असे संकेत आहेत. सदस्य निवडीसाठीची महासभा बोलावण्याचा सर्वस्वी अधिकार महापौरांना आहे. त्यामुळे नगरसचिव कार्यालयाने तसा प्रस्ताव महापौर कार्यालयाकडे १ जानेवारी रोजी पाठविलेला आहे. परंतु, महापौर कार्यालयाकडून याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे स्थायी समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांकडून महासभा घेण्याची मागणी होत आहे. परंतु, नवीन आठ सदस्य निवडीसाठीचा कालावधी निश्चित नसल्याने आठ सदस्यांवरच स्थायीचा कारभार चालविला जाते. यापूर्वी तत्कालीन सभापती संजय गाडे यांच्या कार्यकाळात आठ सदस्यांवरच स्थायी समितीचा कारभार सुरू होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी इच्छुक आग्रही आहेत.
स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर हे राष्ट्रवादीकडून सभापती झाले आहेत.
कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा भाजपने दिला होता. भाजपने कोतकर यांच्याकडून खुलासाही मागविला होता. परंतु, कोतकर यांनी खुलासा केला नाही. भाजपनेही कोतकर यांच्याबाबत बोटचेपे धोरण घेत कारवाई करणे टाळले. त्यामुळे कोतकर हे भाजपचे की राष्ट्रवादीचे, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यात आता आठ सदस्य निवृत्त होत असून, नवीन आठ सदस्य निवडीबाबत कोतकर यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. नवीन सदस्य न निवडता आठ सदस्यांवरच कारभार सुरू ठेवण्याची कोतकर यांची इच्छा आहे. त्यामुळे आठ सदस्यांच्या मुदतवाढीसाठी कोतकर यांच्याकडून पडद्याआडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्यांचा हा प्रयत्न इच्छुक हाणून पाडतील, असेही बोलले जाते आहे.
...
महापौरांच्या भूमिकेकडे नजरा
सर्वांत कमी संख्याबळ असूनही भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विराजमान झाले. सर्वच राजकीय पक्षांतील नगरसेवकांशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध असल्याने त्यांचा कार्यकाळ शांततेत गेला. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात एकही निर्णय वादग्रस्त झाला नाही. पुढील पाच वर्षांतही वाद होणार नाहीत, याची काळजी महापाैर वाकळे घेताना दिसतात. स्थायी समिती सदस्य निवडीस विलंब करून ते इच्छुकांचा वाद ओढवून घेतील, असे वाटत नाही. त्यामुळे वाकळे यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.