लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बालविवाहाचा प्रकार समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:14 IST2025-06-10T16:14:37+5:302025-06-10T16:14:37+5:30
अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बालविवाहाचा प्रकार समोर
Crime News: अहिल्यानगरच्या शेवगाव येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीने आई-वडिलांच्या ताब्यात असलेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखवून तो काम करत असलेल्या तालुक्यातील भातकुडगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने चार दिवस त्या मुलीला ठेवले. यावेळी तक्रारदार तक्रार दाखल करण्यासाठी शेवगाव पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे समजताच त्याने त्या मुलीला शेवगाव पोलिस ठाण्याच्या आवारात आणून सोडले. दरम्यान, तक्रार दाखल होताच सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग व्ही. सुंदरडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकासह रवाना झाले. आरोपीची माहिती काढून त्यास ताब्यात घेऊन सहा तासांच्या आत अटक केले आहे.
दरम्यान, आरोपीने मागील दोन महिन्यांत मुलीला सदर हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.
पीडितेच्या आई वडिलांविरोधातही गुन्हा दाखल
अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलिसांनी सदर अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदविला तेव्हा एक वर्षापूर्वी तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न धुळे जिल्ह्यातील एका मुलासोबत लावून दिल्याचे समोर आले. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी वाढीव कलम लावत तिचे आई, वडील, सासू, सासरे तसेच पती यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास १० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.