अहमदनगर : महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. सावेडी अमरधाम येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, या जागेची आमदार संग्राम जगताप यांनी मंगळवारी पाहणी केली.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, नगरसेवक राजेश कातोरे, उपायुक्त यशवंत डांगे, नगररचनाकार राम चाटणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, युवराज चव्हाण आदी उपस्थित होते.
आमदार जगताप यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला. या प्रकल्पासाठी ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवारपर्यंत आहे. शुक्रवारी निविदा उघडून कार्यारंभ आदेश दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, की सावेडीतील अमरधाम जवळील जागेत हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी १० गुंठे जागेची आवश्यकता आहे. सदर जागा मनपाकडून उपलब्ध करून दिली जात आहे. या प्रकल्पातून प्रतिदिन १२५ जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या भागात वीज उपलब्ध आहे. लवकरच शेड उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल. प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर आहे. ना नफा ना तोटा, या तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात येईल. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार असल्याचे वाकळे म्हणाले.
..
सूचना : फोटो आहे.