जिल्ह्यात ५ हजार रुग्णांना हवे रेमडेसिविर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:21 IST2021-04-20T04:21:24+5:302021-04-20T04:21:24+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविरचे दर शासनाने कमी केले असले तरी गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ...

जिल्ह्यात ५ हजार रुग्णांना हवे रेमडेसिविर
अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविरचे दर शासनाने कमी केले असले तरी गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात एकाही इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे जुन्या दराने इंजेक्शनची विक्री सुरू असून, शहरासह ग्रामीण भागातून ५ हजार इंजेक्शनची मागणी नोंदविण्यात आली आहे.
शहरासह ग्रामीण भागात गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. शहरासह ग्रामीण भागातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयांकडून ५ हजार रेमडेसिविरची मागणी अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शासनाने सर्वच कंपन्यांच्या रेमडेसिविरच्या किमती नव्याने जाहीर केल्या आहेत. गेल्या शुक्रवारी १८६, शनिवारी ८२ रेमडेसिविरचे इंजेक्शन उपलब्ध झाले होते. त्यानंतर रविवारी एकही इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे उपलब्ध इंजेक्शनवर जुन्या दराप्रमाणे एमआरपी आहे. त्यानुसार कोविड हॉस्पिटलमधून रुग्णांना हे इंजेक्शन दिले जात असून, नव्याने उपलब्ध होणाऱ्या इंजेक्शनवर जी एमआरपी येईल त्याप्रमाणे विक्री केली जाणार आहे.
...
कितीही पैसे घ्या, पण इंजेक्शन द्या
रेमडेसिविरचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांकडून रेमडेसिविरची मागणी होत आहे. परंतु, मेडिकलमध्ये इंजेक्शन उपलब्ध नसल्याने नातेवाईकांची पायपीट सुरू आहे. पैसे घ्या पण, इंजेक्शन द्या, अशी मागणी नातेवाईक करू लागले आहेत.
......
नवीन-जुन्या दराबाबत संभ्रम कायम
शासनाने रेमडेसिविरचे दर कमी केले आहेत. परंतु, हे दर जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात एकही इंजेक्शन आले नाही. पुरवठादारांनी जुन्या दराने इंजेक्शन खरेदी केले आहेत. त्यामुळे तेही पूर्वीच्याच दराने विक्री करत आहेत.
.....
असे आहेत दर
कॅडिला- २,८००
डॉ. रेड्डीज- ५,४००
शिल्पा- ४,०००
मायलॅन- ४,८००
ज्यिबलंट-४,७००
हेटेेरो- ५,४००
....
नवीन दर
कॅडिला-८९९
डॉ. रेड्डीज-२७००
शिल्पा-३०००
मायलॅन-३,४००
ज्यिबलंट-३,४००
हेटेरो-३,४९०
....
कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. परंतु, हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्हाभरातून फोन येत आहेत. रुग्णांना वाचविण्यासाठी इंजेक्शन उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- दत्ता गाडळकर, अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन
.....
कोविड हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल, असे शासनाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मेडिकलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. मागणी केल्यानंतरही इंजेक्शन उपलब्ध होत नाही. मागावे लागेल. पण, त्यासाठी ५ ते ७ हजार रुपये घेतले जात आहेत. पैसे देऊनही इंजेक्शन उपलब्ध होत नाही.
- रुग्णाचे नातेवाईक
....
शासनाने नवीन दर जाहीर केले आहेत. त्यानुसार कंपन्यांनी एमआरपी दिलेली असेल. परंतु, नवीन दर जाहीर झाल्यानंतर अद्याप जिल्ह्यात इंजेक्शन आलेले नाही. सध्या ५ हजार इंजेक्शनची मागणी आहे.
- पी. एन. कातकडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
------
डमी -नेट फोटो
कुंडी
टेस्ट
१८ रेमडेसिविर प्राईज डमी
क्लिप