Katepurna Dam : काटेपूर्णा धरण परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सोमवार, १ डिसेंबर रोजी सकाळी १ वाजता सुरू केला. (Katepurna Dam)
दोन्ही सिंचन व्हॉल्व्हमधून २०० घनफूट प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, यामुळे नदीकाठच्या गावांतील हजारो परवानाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(Katepurna Dam)
२० दिवस उशिराचा विसर्ग
दरवर्षी १० ते १५ नोव्हेंबरदरम्यान रब्बीसाठी पाणी सोडले जाते. मात्र, यंदा विसर्गात तब्बल २० दिवसांचा विलंब झाला.
तरी सध्या धरणात ९२.५१% इतका चांगला जलसाठा असल्याने रब्बी हंगामाची सिंचन व्यवस्था सक्षमपणे करता येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
गतवर्षी ७,००० हेक्टर
यंदा उद्दिष्ट ८,३२५ हेक्टर
गतवर्षी रब्बी पेरणी : ७,००० हेक्टर
यंदाचे उद्दिष्ट : ८,३२५ हेक्टर
यंदा परतीच्या पावसामुळे चांगला ओलावा आणि धरण भरून वाहणे यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. परिणामी गहू, हरभरा, ज्वारी, कांदा यांसारख्या रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
या गावांना होणार थेट लाभ
काटेपूर्णा धरणातील पाण्यामुळे खालील नदीकाठावरील गावांना सगळ्यात मोठा फायदा झाला आहे. अन्वी, मिर्झापूर, पळसो बढे, रामगाव, मजलापूर, दापूरा, कौलखेड, भटोरी आदी गावांतील शेतकऱ्यांना थेट सिंचन लाभ मिळेल.
पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.
विहिरी व बोअरवेलची पातळी वाढण्याची शक्यता
जोरदार विसर्गामुळे नदीकाठच्या शेकडो हेक्टर क्षेत्रातील विहिरी, बोअरवेल, ओढे यांची पाणीपातळी लक्षणीय वाढेल, अशी अपेक्षा आहे. याचा थेट फायदा रब्बी पिकांच्या वाढीस होईल.
पाणी व्यवस्थापनावर पाटबंधारे विभागाचे कडक लक्ष
कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, उपविभागीय अधिकारी आदित्य कासार, शाखा अभियंता संदीप नेमाडे, मनोज पाठक हे अधिकारी विसर्गाची देखरेख काटेकोरपणे करीत आहेत.
सहा टप्प्यांत सिंचन नियोजन
अकोला विभागाच्या माहितीप्रमाणे रब्बी हंगामात पाणी नियोजनासाठी सहा टप्प्यांत कालवा आवर्तन जाहीर करण्यात आले आहे.
सहा टप्प्यांचे पाणी आवर्तन (२०२५-२६)
* पहिला टप्पा
१ डिसेंबर – २१ डिसेंबर (२० दिवस)
* दुसरा टप्पा
१ जानेवारी – १५ जानेवारी (१५ दिवस)
* तिसरा टप्पा
२३ जानेवारी – ८ फेब्रुवारी (१५ दिवस)
* चौथा टप्पा
१८ फेब्रुवारी – ३ मार्च (१५ दिवस)
पाचवा टप्पा
११ मार्च – २१ मार्च (१० दिवस)
सहावा टप्पा
२६ मार्च – ३१ मार्च (६ दिवस)
विभागाने स्पष्ट केले की, या टप्प्यांमध्ये अवकाळी पाऊस, पेरणी स्थिती किंवा पिकांच्या गरजेनुसार काही बदल होऊ शकतात.
रब्बी हंगाम उज्ज्वल
उशिरा का होईना, पण विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंद
गहू-हरभरा लागवडीला वेग
पाणीटंचाईची चिंता कमी
सिंचनावर आधारित पिकांना थेट फायदा
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून आगामी पिकाच्या वाढीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Isapur Dam : अखेर इसापूर पाणीपाळी जाहीर; पण कालवा स्वच्छतेचे काय? वाचा सविस्तर
