बारदान्याच्या कमतरतेमुळे गेल्या आठवड्यापासून धाराशिव जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर सोयाबीनच्या खरेदीला खीळ बसली असून, आणखी आठवडाभर बारदान्याअभावी खरेदी बंद राहणार आहे. याविषयी ओरड झाल्यानंतर फेडरेशनने कोलकाता येथून २५ लाखांपेक्षा अधिक बारदाना खरेदी केला आहे.
मात्र, हा बारदाना फेडरेशनकडे उपलब्ध होण्यासाठी काही दिवस लागणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर पोहोचण्यासाठी आठवडा लागणार आहे. तोपर्यंत सर्व केंद्रांवरील खरेदी ठप्प राहणार असून, नडलेल्या शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी सुरूवातीपासून कोणते ना कोणते विघ्न येत आहे.
यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाऐवजी कमी भावाने बाजारात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. सुरुवातीला नोंदणीसाठी ई-पीक पाहणी नसल्याने शेतकऱ्यांना अडचण येत होती. त्यानंतर ॲप अपडेट करण्यासाठी काही दिवस नोंदणी बंद होती. नोंदणीचे काम सुरळीत झाल्यानंतर खरेदीला सुरुवात झाली. १५ नोव्हेंबर रोजी खरेदीला सुरुवात झाली होती, मात्र प्रत्यक्षात १९ नोव्हेंबर रोजी सोयाबीनचे माप घेण्यास सुरुवात झाली.
शेतकऱ्यांनी केंद्रावर माल आणल्यानंतर टॅग नसल्याने काही दिवस शेतकऱ्यांना वाहनांना बसभाडे देऊन केंद्रावर रात्र काढावी लागली. टंगचे काम पूर्ण होते तोच आता बारदाना संपला आहे. सुरुवातीला सोलापूर, त्यानंतर ज्या केंद्राकडे शिल्लक आहे त्यांच्याकडून गरज असणाऱ्या केंद्रांना देण्यात आला. मात्र, गेल्या आठवड्यात सर्वच केंद्रांवरील बारदाना संपला आहे.
यामुळे सर्वच केंद्रांवरील सोयाबीन खरेदी बंद झाली आहे. सर्वच केंद्रांकडून ओरद्ध झाल्यानंतर फेडरेशनने कोलकाता येथून बारदाना खरेदी केला आहे. खरेदी केलेला बारदाना ट्रकच्या माध्यमातून आणण्यात येत असून, याला दोन ते चार दिवस लागणार आहेत. जिल्ह्यात उपलब्ध झालेला बारदाना सर्व केंद्रांना देण्यासाठी काही दिवस लागणार आहेत. या ढिसाळ कारभारामुळे या आठवड्यातही केंद्र बंदच राहण्याची शक्यता आहे.
फेडरेशनच्या गोदामात कर्मचाऱ्यांची कमतरता
• धाराशिव जिल्ह्यात ३१ पैकी २६ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. पैकी २१ केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली आहे. खरेदी केलेले सोयाबीन केंद्राकडून गोदामाकडे पाठवले जाते. मात्र, गोदामात गेलेला एक दोन ते तीन दिवस खाली होत नाही.
• याबाबत काही वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर गोदामात कर्मचारीच कमी असल्याचे समोर आले आहे.
• यामुळे केंद्रांनाही सोयाबीन खरेदी करण्यासाठी अडचण येत आहे. नडलेल्या शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी घाई केली जात असतानाच फेडरेशनकडून बिसाळपणा होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
नोंदणी केलेले शेतकरीही वैतागले
• धाराशिव जिल्ह्यातील २१ केंद्रांवर सुमारे ५० हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. काही शेतकऱ्यांना केंद्राकडून मेसेजही आले आहेत. मात्र, सोयाबीन आणण्यासाठी नकार दिला जात आहे.
• यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना अडचण असल्याने खासगी बाजारात हमीपेक्षा कमी दराने विक्री केली जात आहे.
केंद्रावरील सोयाबीनची खरेदी करण्यासाठी बारदान्याची अडचण आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावला असून, जिल्ह्यासाठी कोलकाता येथे २५ लाखांवर बारदाना खरेदी केला आहे. काही दिवसांत केंद्रांवरही बारदाना उपलब्ध होईल. - भागवत धस, संचालक, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन मुंबई.
