बालाजी आडसूळ
थेट 'डीएमओ' (DMO) अधिनस्थ तीन व इतर संस्थांच्या दोन अशा एकूण कळंब तालुक्यातील ५ खरेदी केंद्रांचा काटा ५ दिवसांपूर्वी ठप्प झाला. यात नोंदणीकृत सव्वाअकरा हजार शेतकऱ्यांपैकी केवळ ४ हजार ६१२ शेतकऱ्यांनाच सोयाबीनचा 'हमीभाव' पावला. या स्थितीत हमीभावापासून वंचित साडेसहा हजार शेतकऱ्यांसाठी मात्र मंगळावर 'मुदतवाढ झाली, नाही झाली' या चर्चेच्या गर्तेत गेला.
आधी निसर्गाचा तडाखा अन् तद्नंतर बाजारातील घटत्या दराचा झपका. गेल्या हंगामातील सोयाबीनचे (Soybean) असेच चित्र राहिले. शासनाने जाहीर केलेला प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ हा दर भरल्या बाजारी कुठेच सापडेना, यामुळे नड असलेल्या शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राची वाट न पाहता जे काही 'थोडेबहुत पिकलं, ते पण बेभाव विकलं' अशीच चित्तरकथा राशीला आली.
यातूनच नोव्हेंबर शासनाने नाफेडच्या माध्यमातून ९० दिवसांची मर्यादा घालत हमीभावाने खरेदी सुरू केली. नोंदणी, त्यानंतर मेसेज, तद्नंतर खरेदी अन् पेमेंट असे याचे स्वरूप होते. परंतु, यातही अनेक संकटांची मालिका.
बहुतांश शेतकऱ्यांना नोंदणी करताना तांत्रिक अडचणी आल्या. शिवाय, बारदान्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर अर्ध्या शेतकऱ्यांची खरेदी पार पडते न पडते तोच जानेवारीअखेर 'कालमर्यादा' संपली. सात दिवसांत तिचाही 'एण्ड' झाला. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना हात हतबल व्हावे लागले आहे.
केंद्र | मेसेज | प्राप्त | शेतकरी | क्विंटल |
कळंब | ३६७९ | १५९४ | १२१७ | ३११३२ |
चोराखळी | २९६० | २३२० | १२२३ | ३१९२७ |
शिराढोण | ६२४ | २८७ | १३१ | ३०४२ |
घारगाव | १९५४ | १९५४ | ७०० | १५२३३ |
आंदोरा | २०४२ | २०४२ | १३४१ | ३०२०० |
मुदतवाढ हवी, मिळाली की नाही?
* एकूणच डीएमओ कार्यालयाच्या अधिनस्त तालुक्यातील तीन केंद्रावरील ७ हजार २६३ पैकी केवळ ४ हजार २०१ शेतकऱ्यांना मॅसेज धाडला, पैकी केवळ २ हजार ५७१ शेतकऱ्यांची खरेदी झाली.
* इतर दोन केंद्रांवरील ४ हजारांपैकी केवळ २ हजार शेतकऱ्यांची खरेदी होऊन केंद्र बंद झाले. यातील असंख्य शेतकऱ्यांच्या कानावर केंद्रास मुदतवाढ झाल्याची कथित चर्चा पडली, यापैकी अनेकांनी केंद्र गाठले.
* तिथं मात्र 'तूर्त तरी असं काही नाही!' असेच उत्तर कानी पडले. या खातरजमा करण्यातच मंगळवारचा दिवस गेला. यामुळे केंद्र चालू व्हावीत, ही भावना दिसून आली.
११ हजारांवर नोंदणी, राहिले किती?
तालुक्यात नोंदणीकृत शेतकऱ्यांचा विचार करता कळंब ३ हजार ६७९, चोराखळी २ हजार ९६०, तर शिराढोण केंद्रावर ६२४ असे ७ हजार २६३, तर इतर केंद्रांच्या आंदोरा २ हजार ४२, तर घारगाव १ हजार ९५४ अशा एकूण ११ हजार २५९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.
यातील कळंब १ हजार २००, चोराखळी १ हजार २२३, शिराढोण २८७ अशा २ हजार ५७१, तर इतर आंदोरा १ हजार ३४१, घारगाव ७०० अशा २ हजार ४१ म्हणजेच एकूण ४ हजार ६१२ शेतकऱ्यांची खरेदी झाली असून, तब्बल ६ हजार ६४७ शेतकरी वंचित राहिले आहेत.
हे ही वाचा सविस्तर: Palas Flowers: वसंत ऋतूची चाहूल लागतच पळस फुलांनी शेतशिवार फुलले