गडचिरोली : रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात वाटाण्याची शेती केली जाते. तर काही बाजारात वाटाण्याच्या (मटार) शेंगा दाखल झाल्या आहेत. मात्र, बाजारात आवक कमी असल्यामुळे या 'हिरव्या मोत्यां'ना अक्षरशः सुकामेव्याचा भाव आला आहे. गडचिरोली शहरात सध्या वाटाण्याच्या शेंगा तब्बल १०० रुपये प्रति किलो दराने विकल्या जात आहेत.
वाटाण्यामधील जीवनसत्त्वे
वाटाणा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. वाटाणा प्रथिने आणि फायबर यांचा उत्तम स्रोत आहे. यात प्रामुख्याने व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए ही जीवनसत्त्वे तसेच फोलेट आणि मँगनीज ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वाटाणा फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात अनेक कुटुंब वाटाण्याच्या दाण्यांची भाजी करून खातात.
सध्या दर कसे आहेत?
पुणे बाजारात सर्वसाधारण वाटण्याला कमीत कमी ११ हजार रुपये तर सरासरी ११ हजार ९०० रुपये असा सर्वाधिक दर मिळतो आहे. तर दुसरीकडे राहता बाजारात कमीत कमी ०५ हजार रुपये तर सरासरी ०५ हजार ५०० रुपये, जुन्नर ओतूर बाजारात कमीत कमी ०३ हजार रुपये तर सरासरी ६ हजार रुपये, कामठी बाजारात कमीत कमी ०६ हजार ७० रुपये तर सरासरी ०६ हजार ३२० रुपये दर मिळतो आहे.
दुसऱ्या जिल्ह्यात उत्पादन
गडचिरोली जिल्ह्यात सध्या वाटाण्याचे स्थानिक उत्पादन पुरेसे उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेला वाटाणा हा मुख्यतः बाह्य जिल्ह्यांमधून किंवा राज्याबाहेरून आयात केला जात आहे. वाहतूक खर्च आणि दलालांची साखळी यामुळे मूळ किंमत वाढून १०० रुपयांपर्यंत पोहोचते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावे
वाटाण्याला सध्या मिळत असलेला १०० रुपये प्रति किलोचा भाव पाहता, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वाटाणा हे उत्तम नगदी पीक ठरू शकते. हिवाळ्याच्या सुरुवातीला हे पीक बाजारात आणल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
