Soyabean Vikri : नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीसाठी (Nafed Soyabean Kharedi) सुरू झालेल्या नोंदणी प्रक्रियेत बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. विशेषतः वयोवृद्ध शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे न लागणे, सर्व्हर डाउन होणे आणि तासनतास रांगेत थांबूनही नोंदणी न होणे या कारणांमुळे शेतकऱ्यांचा त्रास वाढला आहे.
३१ ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच शेतकऱ्यांनी ग्रामसेवा सहकारी सोसायटी केंद्रावर रांगा लावल्या; मात्र दुपारपर्यंत अत्यल्प शेतकऱ्यांचीच नोंदणी पूर्ण होऊ शकली. आधार, बँक पासबुक, सातबारा घेऊन येणे बंधनकारक आहे. नोंदणी प्रक्रिया बाजूला ठेवून थेट मोजणीच्या वेळीच बायोमेट्रिक घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सोयाबीनच्या सरकारी खरेदी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांची नोंदणी बायोमेट्रिक पद्धतीने होते. यासाठी शेतकऱ्याला खरेदी केंद्रावर उपस्थित राहून आधार-आधारित बायोमेट्रिक प्रणालीद्वारे स्वतःची ओळख पटवून नोंदणी करावी लागते. जेव्हा विक्रीचा नंबर येईल, तेव्हा पुन्हा बायोमेट्रिकद्वारे पडताळणी केली जाते.
नोंदणी प्रक्रिया
खरेदी केंद्राला भेट : शेतकऱ्याला सोयाबीन विक्रीसाठी निर्धारित केलेल्या खरेदी केंद्रावर जावे लागेल.
बायोमेट्रिक उपस्थिती : केंद्रावर पोहोचल्यावर, शेतकऱ्याला बायोमेट्रिक उपकरणावर अंगठा लावून आपली उपस्थिती नोंदवावी लागेल. यासाठी उपकरणावर बोट ठेवून दाबणे आवश्यक आहे.
नोंदणी पूर्ण : बायोमेट्रिकची नोंद झाल्यावर शेतकऱ्याची नोंदणी पूर्ण होईल आणि ते विक्रीसाठी पात्र ठरतील.
पडताळणी : जेव्हा सोयाबीन विकण्याची वेळ येईल, तेव्हा पुन्हा एकदा बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल.
शेतकऱ्याची प्रत्यक्ष उपस्थिती : नोंदणी प्रक्रियेसाठी शेतकऱ्याचे स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
