नामदेव मोरे
नवी मुंबई : हिवाळा सुरू झाल्यापासून उष्मांक जास्त असलेले धान्य व पदार्थांना मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही बाजरीच्या विक्रीत वाढ झाली आहे.
होलसेल मार्केटमध्ये २८ ते ४५ रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ४५ ते ५० रुपये किलो दराने बाजरीची विक्री होत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये १ डिसेंबरला ६७ टन बाजरीची आवक झाली आहे.
२८ नोव्हेंबरला सर्वाधिक १७३ टन आवक झाली होती. रोज सरासरी ७० ते १०० टनापर्यंत आवक होत आहे. बाजरीची वर्षभर विक्री होत असली तरी हिवाळा सुरू झाला की मागणी जवळपास दुप्पट वाढत असते.
हिवाळ्यात आरोग्य चांगले राहावे यासाठी अनेक नागरिक बाजरीच्या भाकरीला प्राधान्य देतात. ज्वारी, तांदळाच्या भाकरीपेक्षा व गव्हाच्या चपतीपेक्षा बाजरीची रुचकर असल्यामुळेही हिवाळ्यात त्याला पसंती दिली जाते.
हॉटेलमध्येही आता बाजरीची भाकरी मिळू लागली आहे. मुंबईमध्ये सोलापूरमधून मोठ्या प्रमाणात बाजरीची आवक होत आहे. याशिवाय इतर जिल्ह्यांमधूनही आवक होत असून काही प्रमाणात इतर राज्यांमधूनही आवक होत असते.
कोठे होते उत्पादन?
◼️ देशात राजस्थानमध्ये सर्वाधिक बाजरीचे उत्पादन होते. यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्राचा समावेश होतो.
◼️ राज्यात सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, बीड, पुणे, सातारा च सांगली जिल्ह्यात बाजरीचे उत्पादन होते.
राज्यभरात बाजरीचा प्रतिकिलो भाव
बाजार समिती - भाव
मुंबई - २८ ते ४५
अमरावती - २२ ते २५
जालना - २४ ते ३४
माजलगाव - २८ ते ३७
सांगली - २७ ते ३५
पुणे - २० ते ३०
छ. संभाजीनगर - ३८ ते ४६
बाजरीचे पदार्थ
बाजरीची भाकरी, थिरडे, खिचडी, लाडू, थालीपीठ, भजी, मल्टिग्रेन चपाती व इतर वस्तू तयार केल्या जातात.
बाजरी वर्षभर उपलब्ध होत असली तरी हिवाळ्यात त्याच्या विक्रीत वाढ होत असते. सद्य:स्थितीमध्ये सोलापूरमधून बाजरीची आवक होत आहे. - नीलेश वीरा, संचालक धान्य मार्केट
अधिक वाचा: वर्ग-२ प्रकारातील सर्व जमिनींची तपासणी होणार? वर्ग-२ मध्ये नक्की कोणकोणत्या जमिनी येतात?
