बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ३१०१ रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे.
सोमवारी (दि. १) संचालक मंडळाने एकत्रित बैठक घेत सभासद आणि बिगरसभासदांसाठीदेखील अॅडव्हान्स जाहीर केला आहे, अशी माहिती चेअरमन पृथ्वीराज जाचक, व्हाइस चेअरमन कैलास गावडे यांनी माहिती दिली.
अधिक माहिती देताना जाचक आणि गावडे म्हणाले, जानेवारीपासून गाळपास येणाऱ्या खोडवा उसाला पहिल्या हप्त्याशिवाय १०० रुपये दिले जाणार आहे. त्यामुळे खोडवा उसासाठी ३२०१ रुपये पहिला हप्ता मिळेल.
तसेच त्यानंतर येणाऱ्या पूर्वहंगामी आणि सुरू उसाला ७५ रुपये अनुदान दिले जाणार आहे. उसाचा हप्ता देताना सोसायटी अथवा कोणतीही थकबाकी कपात केली जाणार नाही.
आम्ही ठेवलेले १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर दिवाळीला निश्चितपणे चांगले 'पेमेंट' देणं शक्य होईल. सभासदांनी गाळपास ऊस देऊन सहकार्य करावे. सात महिन्यांनंतर संचालक मंडळाने ऊस दराचा उच्चांक केला आहे.
यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सभासदांसह, कर्मचारी अधिकारी यांचे मोठे योगदान आहे. तेच कामगार आणि तीच यंत्रणा आहे.
मात्र बदललेल्या संचालक मंडळामुळे कारखान्याने पहिल्या दिवसापासूनच ऊस गाळप आणि साखर उत्पादनाला जोर धरला आहे.
संस्थापक संचालक मंडळानंतर प्रथमच या संचालक मंडळाने क्रांतिकारी कामगिरी करीत आदर्श वस्तुपाठ मांडल्याचे जाचक आणि गावडे यांनी सांगितले.
दरम्यान, पहिला हप्ता जाहीर झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.
११.०९ साखर उतारा
◼️ २९ दिवसांत कारखान्याने २ लाख १६ हजार ५०३ टन ऊस गाळप, २ लाख १२ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन घेतले.
◼️ गतवर्षी हेच गाळप ५० हजार ३७५ टन होते. कारखान्याने उच्चांक करत ८६०० टन प्रतिदिन गाळपाचा आकडा गाठला.
◼️ तर सरासरी ७२१६ टन प्रतिदिन गाळप सुरू आहे.
◼️ साखर उतारा सध्या १०.२२ टक्के सरासरी असून दररोजचा साखर उतारा हा ११.०९ टक्के एवढा गाठला आहे.
माझा कारखाना माझी जबाबदारी, वजन चोख, पैसे रोख आणि कारखान्याला ऊस द्या बिनधोक या घोषवाक्यावर विश्वास ठेवत सभासदांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर आता वेळेत धन एक हजार किलो उसाचाच एक टन, या नव्या 'थीम'वर आम्ही ऊस उत्पादकांना साद घातली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. - पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना
अधिक वाचा: श्री दत्त साखर कारखान्याचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; विनाकपात कसा दिला दर?
